चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी : एकाच रात्रीत १२३.२ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:16+5:302021-09-02T04:36:16+5:30
जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. चाळीसगाव ...

चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी : एकाच रात्रीत १२३.२ मि.मी. पाऊस
जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे तितूर व डोंगरी या नद्यांसह नाल्यांना मोठा पूर आला. चाळीसगाव शहरातील ७५० घरांमध्ये पाणी शिरले असून सुमारे ५०० जनावरे वाहून गेली आहेत. वाकडी येथील ६० वर्षीय महिला पुरात वाहून गेली आहे. या पुराचा चाळीसगाव तालुक्यातील ३३ गावांना फटका बसला आहे. कन्नड घाटात दरड कोसळण्यासह भूस्खलन झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
सोमवारी रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यात ढगफुटीसदृश परिस्थिती होऊन मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे परिसरातील तितूर, डोंगरी या नद्यांना पूर आला. या पुराचे पाणी नदीकाठावरील गावांमध्ये व घरांमध्ये शिरले. त्यामुळे या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. चाळीसगाव शहरातील ७५० घरांमध्ये पाणी शिरले आहे. ५०० पेक्षा जास्त गुरे वाहून गेली आहेत्. गावात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले असून नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
एक अनोळखी मृतदेह वाहून आला
वाकडी येथे कलाबाई सुरेश पवार (वय ६०) या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर पिंपरखेड येथे आश्रमशाळेच्या मागील बाजूस बाल्डे नदीच्या पाण्यात एक मृतदेह वाहून आला. कन्नड घाटासह पाटणादेवी परिसरात सोमवारी रात्रीनंतर अतिवृष्टी झाल्याने डोंगरी नदीला मोठा पूर आला.
कन्नड घाटात दरड कोसळली
अतिवृष्टीने कन्नड घाटात आठ ते दहा ठिकाणी दरड कोसळून भूस्खलन झाल्याने रस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. यामुळे येथील वाहतूक थांबविण्यात आली आहे. दरम्यान, येथे अनेक वाहने अडकून पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, यावेळी झालेल्या अपघातात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कन्नड घाटात ४०० वाहने अडकली
कन्नड घाटात आठ ते दहा ठिकाणी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची सुमारे ४०० वाहने अडकून पडली आहेत. दरम्यान, दरड कोसळल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या ३० जवानांकडून मदतकार्य
मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. या तुकडीच्या माध्यमातून औट्रम घाटात मदतकार्य सुरू आहे. चाळीसगाव शहरासह वाकडी, वाघडू, हिंगोणे, खेर्डे, मुंदखेडे, रोकडे, बोरखेडा खुर्द, पातोंडा, ओझर, टाकळी आदी गावांतील नदीकाठावरील रहिवाशांना प्रशासनाच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
भडगाव तालुक्यातही तितूरचा हाहाकार
भडगाव तालुक्यात साधारण पाऊस झाला असला तरी चाळीसगावमधून येणाऱ्या तितूर नदीला येथे महापूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. काही घरांचे व जनावरांचेही नुकसान झाले आहे.
पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ठाण मांडून
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चाळीसगाव शहरासह वाकडी या गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची माहिती देऊन नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
रात्री कन्नड घाट परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सकाळपासून मदतकार्य सुरू केले. रात्री अंधारामुळे मदतकार्य थांबविण्यात आले आहे. बुधवारी सकाळी कामाला सुरुवात करण्यात येईल. संध्याकाळपर्यंत चाळीसगाव शहरातील पाणी हे काही प्रमाणात ओसरले आहे.
अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.