लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने होत असताना शुल्क हे ऑफलाइन परीक्षा पद्धतीप्रमाणे आकारले जात आहे. त्याच बरोबरीने शुल्कात प्रोजेक्ट शुल्क ही मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. त्यामुळे हे शुल्क कमी करण्यात यावे यासह इतर मागणीचे निवेदन गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आमदार सुरेश भोळे यांना देण्यात आले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आमदार सुरेश भोळे यांची विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांबाबत भेट घेतली. नंतर चर्चा करून त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अभाविपचे जळगाव महानगर मंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, संकेत सोनवणे, आकाश पाटील, चिराग तायडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
- क्रीडा क्षेत्रात आपले भवितव्य उज्ज्वल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान या कोविड काळात झालेले आहे. मागील दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून कुठल्याही प्रकारच्या क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांची क्रीडा प्रकारात सहभागी होण्याची वयोमर्यादा संपलेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी.
- स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे भरमसाठ असलेले शैक्षणिक शुल्क कमी करण्यात यावे.
- कोविडमुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील यांचा मृत्यू झालेला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा तसेच सर्व विद्यापीठांनी अशा विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना सुरू करून या अंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करावे.
- विद्यार्थ्यांना या कोविड काळामध्ये अभ्यास करण्यासाठी पुरेसे साधने उपलब्ध नाहीत. त्याचबरोबर अनेक अभ्यासक्रमांचे संदर्भ पुस्तकेदेखील उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी ग्रंथालये ऑनलाइन उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करता येणे शक्य होईल.