राखी पौर्णिमेलाही बहिणींची भावाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:59+5:302021-08-20T04:21:59+5:30
ट्रॅव्हल्सला घरघर कायम; निम्म्याच गाड्या धावताहेत सुनील पाटील जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी यंदा राखी पौर्णिमेला ...

राखी पौर्णिमेलाही बहिणींची भावाकडे पाठ
ट्रॅव्हल्सला घरघर कायम; निम्म्याच गाड्या धावताहेत
सुनील पाटील
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी यंदा राखी पौर्णिमेला बहिणींनी भावाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या असो की बाहेरगावावरून जळगावला येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला प्रवासीच मिळत नाहीत. त्यामुळे एकूण बसेसच्या संख्येत निम्म्याच बस नियमित धावत असून त्यादेखील पूर्ण क्षमतेने धावत नाहीत, त्यामुळे काही वेळा डिझेलचा खर्च निघणेही अवघड झालेले आहे. प्रवासी आकर्षित करण्यासाठी पूर्वीपेक्षा भाड्यात कपात करण्यात आली आहे. बस रस्त्यावर धावायला लागली म्हणजे टॅक्स भरावाच लागतो. मग प्रवासी मिळो अथवा ना मिळो. राखी पौर्णिमा जवळ आली तरी प्रवासी संख्या वाढत नाही. ना बहिणी प्रवास करीत आहेत, ना भाऊ. कोरोनामुळे बहुतांश बहीण, भावांच्या नशिबी रक्षाबंधन नाही. त्यामुळे मोबाइलवरूनच शुभेच्छा देण्यावर अनेकांचा भर राहणार असल्याचे आज तरी चित्र आहे.
असे आहे ट्रॅव्हल्सचे भाडे
मार्ग पूर्वी आता
जळगाव-पुणे ६५० ६००
जळगाव-मुंबई ७०० ६५०
जळगाव-सुरत ६०० ५००
जळगाव-नागपूर ९०० ९००
ट्रॅव्हल्सची संख्या घटली
जळगावातून एकट्या पुण्यासाठी ४५ ते ५० बसेस पूर्वी रोज धावत होत्या,आता ही संख्या २५ ते २८च्या घरात आहे. मुंबई, सुरत, अहमदाबाद, इंदूरला जाणाऱ्या बसेसची संख्या घटली आहे. नागपूरसाठी तर फक्त एकच बस धावत आहे, त्यातदेखील प्रवासी मोजकेच असतात. त्यामुळे भाड्यातही कपात करण्यात आली आहे. तरीदेखील प्रवाशांचा प्रतिसाद नाही. प्रवाशांअभावी निम्म्यापेक्षा जास्त ट्रॅव्हल्स बस घरीच उभ्या आहेत.
कोट....
डिझेल दरवाढीमुळे व्यवसायात तोटा
काही वर्षांपूर्वी शासनाने एस.टी. बसपेक्षा दीडपट भाडे घेण्यास ट्रॅव्हल्स मालकांना परवानगी दिली होती. तेव्हा डिझेलचे ६२ रुपये होते तर भाडेदेखील ५००च्या जवळपास होते. आता डिझेलचे दर ९७ रुपये आहे. भाड्यात फक्त १०० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोनामुळे तर प्रवासीच मिळत नाहीत. कधी कधी तर निम्मेही प्रवासी नसतात, तर एकीकडून बस रिकामीच धावते. एस.टी.पेक्षा जास्त कर शासनाला भरतो, तरीदेखील पार्सल व इतर बाबींची परवानगी मिळत नाही. ती एस.टी.ला लागलीच मिळते.
- सुशील नेटके, ट्रॅव्हल्स बस मालक