प्रशिक्षणानंतरही महामंडळातील ‘१७२’ उमेदवार बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:21 IST2021-08-24T04:21:13+5:302021-08-24T04:21:13+5:30
जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या चालक-वाहक भरती प्रकियेत निवड झालेल्या १७२ उमेदवारांचे कोरोनामुळे रखडलेले प्रशिक्षण नुकतेच पूर्ण ...

प्रशिक्षणानंतरही महामंडळातील ‘१७२’ उमेदवार बेरोजगार
जळगाव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या चालक-वाहक भरती प्रकियेत निवड झालेल्या १७२ उमेदवारांचे कोरोनामुळे रखडलेले प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, जळगाव विभागातील या ‘१७२’ उमेदवारांना प्रशिक्षणानंतरही नोकरीची नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नसून, सेवेत घेण्याबाबत जळगाव विभागातर्फे महामंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
एसटी महामंडळातर्फे २०१९ मध्ये राज्यभरात चालक-वाहक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत महामंडळाच्या जळगाव विभागात चालक व वाहक मिळून १७२ उमेदवारांची निवड झाली होती. निवड झालेल्या उमेदवारांची २०२० मध्ये प्रशिक्षणाला सुरूवात झाल्यानंतर, काही दिवसातच कोरोना संसर्ग सुरू झाला होता. यामुळे या उमेदवारांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले होते. त्यानंतर वर्षभराने यंदा जून महिन्यात या उमेदवारांचे रखडलेले प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर पूर्वी महामंडळात निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती पत्रे देण्यात येत होती. मात्र, यंदा उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण होऊनही नियुक्ती पत्रे देण्यात आलेली नाहीत.
इन्फो :
प्रशिक्षणानंतरही युवक बेरोजगार
जळगाव विभागातील निवड झालेल्या १७२ उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कोरोना संसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे महामंडळाने या उमेदवारांचेही प्रशिक्षण थांबविले होते. पहिल्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, महामंडळाने प्रशिक्षण घेण्याबाबत या उमेदवारांचा अनेकवेळा पाठपुरावा लागला, त्यानंतर कुठे महामंडळाने वर्षभराने या उमेदवारांचे प्रशिक्षण घेतले. मात्र, आता प्रशिक्षण झाल्यानंतरही या उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे हे युवक सध्या बेरोजगार असून, नोकरीच्या नियुक्ती पत्राची वाट पहात आहेत.
इन्फो :
आर्थिक परिस्थितीमुळे महामंडळाकडून नियुक्ती पत्रे मिळेना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महामंडळाकडे पैसे नाहीत. त्यात जर प्रशिक्षण झालेले उमेदवार सेवेत घेतले तर, महामंडळाच्या तिजोरीवर अधिक आर्थिक बोजा पडेल. सध्याच्याच कर्मचाऱ्यांना पगाराचे पैसे देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नसतांना, निवड झालेल्या उमेदवारांना पगार कसा देणार, असा प्रश्न महामंडळासमोर आहे. त्यामुळे या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, महामंडळाची परिस्थिती सुधारल्यानंतर, काही महिन्यांत या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
इन्फो :
जळगाव विभागातील निवड झालेल्या १७२ उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्या उमेदवारांना सेवेत घेण्याच्या प्रक्रियेबाबत महामंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
-भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग