चार वर्षांनंतरही महामंडळाकडून उत्तीर्ण उमेदवारांचे प्रशिक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:17 IST2021-07-27T04:17:10+5:302021-07-27T04:17:10+5:30
जळगाव : सन २०१७ मध्ये एसटी महामंडळाच्या ठाणे येथील भरती प्रक्रियेत चालक- वाहक परीक्षेत पास होऊनही, जिल्ह्यातील अनेक उमेदवारांचे ...

चार वर्षांनंतरही महामंडळाकडून उत्तीर्ण उमेदवारांचे प्रशिक्षण नाही
जळगाव : सन २०१७ मध्ये एसटी महामंडळाच्या ठाणे येथील भरती प्रक्रियेत चालक- वाहक परीक्षेत पास होऊनही, जिल्ह्यातील अनेक उमेदवारांचे चार वर्ष उलटूनही अद्याप महामंडळातर्फे प्रशिक्षण घेण्यात आलेले नाही. त्यामुळे निवड होऊनही हे उमेदवार सध्या बेरोजगार आहेत. नोकरीसाठी दर महिन्याला या उमेदवारांना मुंबईला फेऱ्या माराव्या लागत आहेत. महामंडळाच्या या संथ गतीच्या कारभाराबद्दल या विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे सन २०१७ मध्ये कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चालक आणि वाहक या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत एकट्या ठाणे विभागात १ हजार ९३२ जागांसाठी भरती झाली होती. भरतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादीही महामंडळातर्फे प्रसिद्ध झाली. यावेळी एक हजाराहून अधिक मुलांना प्रशिक्षणासाठी नियुक्ती पत्रेही देण्यात आली होती तर उर्वरित निवड झालेल्या उमेदवारांनाही लवकरच प्रशिक्षणासाठी निवड पत्र देण्यात येणार असल्याचे महामंडळातर्फे जाहीर करण्यात आले होते; मात्र चार वर्षे उलटूनही महामंडळाकडून उर्वरित उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षणासाठी अद्याप बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण होऊनही उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी चार वर्षांपासून घरीच बसून आहेत. प्रशिक्षण कधी सुरू होणार, याच्या चौकशीसाठी या विद्यार्थ्यांना दर महिन्याला मुंबईतील महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
इन्फो :
महामंडळाकडून दिशाभूल होत असल्याचा उमेदवारांचा आरोप
महामंडळाने १ हजार ९३२ जागांपैकी एक हजाराहून अधिक मुलांना नियुक्ती पत्रे दिली. उर्वरित उमेदवारांना ठाणे विभागात जागा रिक्त नसल्यामुळे लवकरच मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागात प्रशिक्षणानंतर नोकरी देणार असल्याचे विद्यार्थांना कळविले होते. याबाबत विद्यार्थांकडून त्यांच्या मर्जीनुसार ठाणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये नोकरीसाठी तयार असल्याबाबत निवड झालेल्या विद्यार्थांकडून `संमतीपत्र`ही भरून घेतले होते; मात्र हे संमतीपत्र भरल्यानंतरही विद्यार्थांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आलेले नाही. त्यामुळे या सर्व प्रक्रियेमुळे महामंडळाकडून उत्तीर्ण उमेदवारांची दिशाभुल होत असल्याचा आरोप या उमेदवारांमधून करण्यात येत आहे.
इन्फो :
महामंडळातर्फे २०१७ मध्ये ठाणे येथे घेण्यात आलेल्या चालक-वाहक भरती प्रक्रियेत मी सर्व परीक्षा उतीर्ण झालो. निवड झालेल्या यादीमध्येही माझे नाव आले; मात्र महामंडळातर्फे चार वर्षांनंतरही प्रशिक्षणासाठी बोलाविण्यात आलेले नाही. त्यामुळे मी सध्या बेरोजगार असून, महामंडळाच्या नोकरीची वाट पाहत आहे.
पंकज सूर्यवंशी, उत्तीर्ण उमेदवार
इन्फो :
महामंडळाची चालक-वाहक परीक्षा चार वर्षांपासून उत्तीर्ण होऊनही, महामंडळातर्फे अद्याप प्रशिक्षणासाठी बोलाविलेले नाही. जागा रिक्त झाल्यावर कोकण विभागात कुठे नोकरी देणार, अशा आशयाचे संमतीपत्र भरून घेतले आहे. हा एक प्रकारे महामंडळाकडून दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे.
संदीप पाटील, उत्तीर्ण उमेदवार