Erandol taluka's contribution to freedom struggle | स्वातंत्र्य चळवळीत एरंडोल तालुक्याचे मोलाचे योगदान
स्वातंत्र्य चळवळीत एरंडोल तालुक्याचे मोलाचे योगदान

बी.एस.चौधरी
एरंडोल, जि.जळगाव : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तालुक्यातील आडगाव व एरंडोल या दोन गावांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या गावांमध्ये स्वातंत्र्य चळवळ मोठ्या प्रमाणात फोफावली होती. दोन्ही गावे मिळून सुमारे ७० ते ८० स्वातंत्र्यसैनिकांची शासन दप्तरी नोंद झालेली होती. आज एकही स्वातंत्र सैनिक हयात नाही. त्यांच्या विधवा पत्नीची नावे दप्तरी आहेत.
स्वातंत्र्यसैनिकांचे एरंडोल तालुका हे केंद्रस्थान होते. स्व.दत्तात्रेय वामन काळकर हे या चळवळीचे प्रमुख नेते होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आडगाव व एरंडोल या गावांनी यथाशक्ती योगदान दिलेले आहे. या गावांमध्ये लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी, यासारखे थोर नेते झाले नसतील परंतु या नेत्यांचे आदेश तंतोतंत पाळणारे, त्यांच्या आवाहनाला सकारात्मक साथ व प्रतिसाद देणारे असे स्थानिक नेते व कार्यकर्ते या गावांमध्ये होऊन गेले.
आडगाव येथे झालेल्या स्वातंत्र्य लढ्यात तीन महिन्यापासून ते तीन वर्षापर्यंत तुरुंगवास भोगलेले तीस स्वातंत्र्यसैनिक तसेच स्वातंत्र्य लढ्यातील अनेक भूमिगत कार्यकर्ते या गावांनी दिले. १९४२ च्या लढ्यात स्वातंत्र्यसेनानी ब्रिटिशांच्या बंदुका मोडल्या होत्या. ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबारात भगवान भुसारी, शामराव पाटील, त्र्यंबक वाणी हे हतात्मा झाले.
या ठिकाणी ब्रिटिशांनी गोळीबार केला. तेथे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, क्रांतिकारकांचे बलिदान याची माहिती या माध्यमातून मिळत आहे.
१९४२ च्या चले जाव चळवळ या आंदोलनात तालुक्यातील सामान्य जणांनी सक्रिय सहभाग घेतला. मोठ्या सत्याग्रहातही कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. जंगल सत्याग्रहामध्ये शहादू चौधरी, नारायण मुसांदे, कौतिक पाटील, सका पुणेकर, बाजीराव पाटील, बुधा महाजन, दशरथ महाजन, हरी पाटील, नामदेव पवार, अमृत वनवे, रामदास कोळी, धनराज पांडे यांनी भाग घेतला. यापैकी आठ सत्याग्रहींना कारावासाची शिक्षा झाली. प्रभात फेऱ्या काढल्या म्हणून १४ जणांना एक वर्ष तीन महिने शिक्षा झाल्या.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत इंग्रजांच्या बंदुकांच्या गोळ्या छातीवर झेलून हुतात्मा झालेले वीरपुत्र या तालुक्याला लाभल्याचा सर्वांना अभिमान वाटतो. तुरुंगाला घर मानणारे इंग्रजांच्या लाठ्या-काठ्या खाणारे असे कार्यकर्ते एरंडोल तालुक्याच्या मातीतून जन्माला आले. स्वत:चे घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यचळवळीत उडी घेणारे कार्यकर्ते त्यांचे शौर्य व धैर्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरू शकते.
क्रांतिकारक तालुका म्हणून एरंडोल तालुक्याची ओळख झाली. न्यायासाठी संघर्ष करण्याची तयारी अन्यायाविरुद्ध लढण्याची परंपरा देशाभिमान देशप्रेम देशभक्ती या साºया बाबी तालुक्यातील जनमानसातून उमटून येतात.


Web Title: Erandol taluka's contribution to freedom struggle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.