कच्चे रस्ते असलेले तालुक्याचे शहर एरंडोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 19:15 IST2020-11-08T19:14:43+5:302020-11-08T19:15:29+5:30
सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात.

कच्चे रस्ते असलेले तालुक्याचे शहर एरंडोल
एरंडोल : सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात खेडोपाडी गावांतर्गत रस्ते पक्के झाले आहेत. मात्र एरंडोल येथे अजूनही नवीन वसाहतींमध्ये रस्ते कच्चे असल्याचे दिसून येते. सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतींमध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते.
एरंडोल हे तालुक्याचे खेडे वजा शहर आहे. गेल्या ४५ वर्षात येथे अनेक नवीन वसाहती अस्तित्वात आल्या. त्यात मूळ शहरालगत असलेल्या रामचंद्र नगर, पद्मावती पार्क व सावतामाळी नगर या भागात अजूनही मातीचे रस्ते आहेत. तसेच आनंद नगर, गुरुकुल कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, काशी पुनमचंद नगर, ओम नगर, आदर्श नगर, हनुमान नगर या शहराच्या पश्चिम भागात कच्चा रस्त्यांमुळे रहिवासी जाम वैतागले आहेत.
शहराच्या पूर्व भागात न्यू लक्ष्मी नगर, हिंगलाज कॉलनी, गणपती नगर, शंकर नगर, हरिओम नगर, न्यू साईनगर, प्रभा नगर या नवीन वसाहतींमध्ये बुद्धा कच्चा रस्त्यांची समस्या नागरिकांना भेडसावत आहे.
विशेष हे की नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी वेळोवेळी रस्ते पक्के करण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली आहेत, असे नागरिकांनी सांगितले.
विशेषतः पावसाळ्यात चिखलातुन पाण्याची डबकी यातून नागरिकांना वृद्धांना शाळकरी मुलांना मार्ग काढावा लागतो.ह्यहरवली वाट ,सापडेना चाल, तरी म्हणा नव्या शतकाकडे वाटचालह्ण अशा संतप्त आशयाच्या प्रतिक्रिया पावसाळ्यामध्ये या नवीन वसाहतींमधील नागरिकांच्या ऐकायला मिळतात. आमच्या पेक्षा खेड्यातील लोक बरे कारण खेडोपाडी गावात पक्के रस्ते झाले आहेत पण एरंडोल हे तालुक्याचे नगरपालिकेचे कार्यक्षेत्राचे शहर असूनही याठिकाणी कच्चा रस्त्याची समस्या भेडसावत आहे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे, असा सूर उमटत आहे.