बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; भुसावळनजीक गाडीचा तीन तास खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2023 19:51 IST2023-09-24T19:51:08+5:302023-09-24T19:51:34+5:30
यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.

बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; भुसावळनजीक गाडीचा तीन तास खोळंबा
वासेफ पटेल, भुसावळ (जि. जळगाव): इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे काचीगुडा-बिकानेर हॉलिडे स्पेशल (गाडी क्र. ०७०५३) या गाडीचा भादली स्थानकाजवळ रविवारी दुपारी तब्बल तीन तासांचा खोळंबा झाला. इंजिन बदलल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.
भुसावळ स्थानकाहून फलाट क्रमांक दोनवरुन काचीगुडा-बिकानेर हॉलिडे स्पेशल गाडी रविवारी दुपारी १:१९ मिनिटांनी जळगावच्या दिशेने रवाना झाली. मात्र, रस्त्यातच भादलीजवळ दुपारी १:३० वाजता इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला.
जळगाव येथून एनटीएसके मालगाडीचे इंजिन नेण्यात आले. ते काचीकुडा गाडीला लावण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेला तब्बल तीन तासांचा अवधी लागल्यामुळे गाडी दुपारी ४:२३ मिनिटाने पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान, यामुळे प्रवाशांनी चांगला संताप व्यक्त केला. यापूर्वी देखील १२ सप्टेंबर रोजी भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये याच ठिकाणी बिघाड झाला होता. त्यावेळेसही प्रवाशांचे असेच हाल झाले होते.