साकेगाव ग्रामपंचयातीत दोनच महिन्यात ३५ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:45 IST2020-12-04T04:45:55+5:302020-12-04T04:45:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कर वसुलीचे ३५ लाख ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात न भरता परस्पर खर्च केल्याचा ठपका ठेवत, ...

साकेगाव ग्रामपंचयातीत दोनच महिन्यात ३५ लाखांचा अपहार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कर वसुलीचे ३५ लाख ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात न भरता परस्पर खर्च केल्याचा ठपका ठेवत, साकेगाव ता. भुसावळ येथील ग्रामविकास अधिकारी गौतम आधार वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दप्तर तपासणीनंतर आलेल्या अहवालानंतर सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
जानेवारी २०२० ते मार्च २०२० या दोन महिन्यातील ही अनियमितता समोर आली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी आर. एम. खैरनार व विस्तार अधिकारी एन. डी. ढाके यांच्या समितीने साकेगाव ग्रामपंचायतीला जावून ६ ते १४ जुलै दरम्यान दप्तर तपासणी केली होती. त्यानुसार त्यांनी विविध मुद््यांच्या आधारे किती रक्कम वसूल झाली व परस्पर खर्च झाली याचा लेखा जोखा मांडला आहे. त्यानुसार प्रथदर्शनी ग्रामसेवक दोषी आढळत असल्याने त्याची विभागीय चौकशी सुरू करून निलंबनाची कारवाई करावी, असा अहवाल देण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकाऱ्यावरील दोषारोप पत्र व सरपंचावर कारवाईसाठी सीईओंनी गटविकास अधिकाऱ्यांकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
असा आहे घोळ
घरपट्टी, पाणीपट्टी, जमा खर्च याबाबात अनियमितता आढळून आली आहे.
वसूल घरपट्टी पाणीपट्टी या रक्कमा बँकेत न भरता त्याच दिवशी परस्पर खर्च करण्यत आलेल्या आहेत. ५०० रूपयावरील प्रदाने धनादेशाने न देता रोखीने दिलेली आहेत. खरेदी केलेल्या साहित्याचा हिशोब ठेवलेला नाही, विहीत पद्धतीचा अवलंब न करता खरेदी करण्यत आलेली आहे.
अशी आहे अनियमितता
दप्तर तपासणीत ग्रामनिधी १९लाख ३४ हजार १८८,पाणीपट्टी १ लाख ४७ हजार ७५० तर १४व्या वित्त आयोगात १४ लाख १३ हजार३२० अशी एकूण ३५ लाख २३ हजार १४ ही रक्कम वसूलीस पात्र असल्याचे अहवालात नमूद आहेत.