बात्सरला एल्गार... बाटली आडवी झालीच पाहिजे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:37 IST2019-08-16T22:37:07+5:302019-08-16T22:37:38+5:30
पती,मुले व्यसनाधीन : स्वातंत्र्यदिनी दारुबंदीसाठी महिला धडकल्या ग्रा.पं.वर

बात्सरला एल्गार... बाटली आडवी झालीच पाहिजे !
खेडगाव, ता. भडगाव : बात्सर येथे कधी नव्हे ती हिंमत ५० च्यावर महिलांनी दाखवित स्वातंत्र्य दिनानिमीत्त ग्रा.पं. समोर सुरु असलेल्या कार्यक्रम स्थळी जावुन गावात दारुबंदी झालीच पाहीजे, हा आग्रह धरला. यावेळी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकुन घेत तसा महिला ग्रामसभेचा ठराव करण्यात आला.
यानुसार भडगाव येथे जावुन पोलीस अधिकारी यांना याविषयी ज्ञात करुन गावी दारुबंदीसाठी विशेष मोहीम राबाविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसात बात्सर येथे दारुचा सुळसुळाट झाला आहे. दारुच्या आहारी आदिवासी, शेतमजुर वर्ग यांच्या घरातील कर्ता पुरुष तर गेलेच आहेत पण त्यांची लहान मुले देखील हेच अनुकरण करीत व्यसनाच्या वाटेवर आहेत. यामुळे घरातील महिलांची चिंता वाढली आहे.
दिवसभर शेतात शेतमजुरी करीत शिणलेल्या माहिला संध्याकाळ पासुन दारुडा नवºयाच्या होणाºया जाचास , भानगडीस वैतागल्या आहेत. याशिवाय दारुमुळे व्यसनी झालेल्यांना अनेक व्याधी जडत ते मृत्युच्या दारात असल्याचे या महिला सांगतात. शेतमजुरीतुन उपजिवीका करावी की व्यसनाधीन झालेल्यांना खर्च करावा या कात्रीत महीला सापडल्या आहेत.
यामुळेच या महिलांनी स्वातंत्र्य दिनी ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांसमोर आपली वरील कैफियत मांडत याविरोधात लढा देण्याचा निर्धार केला आहे.
पिचर्डे येथेही फुंकले रणशिंग
बात्सरडे जवळलीच पिचर्डे येथे देखील शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने गावात दारुबंदीसाठी रणशिंग फुकले आहे. बात्सर, पिचर्डे ही गावे एकमेकास लागुन आहेत. यामुळे महिलांच्या दारुबंदी चळवळीस बळ मीळत आहे. दोन्ही गावातुन शिंदीच्या धर्तीवर बाटली आडवी करण्याच्या निर्धाराने महिलांनी पदर खोचला आहे. स्वातंत्र्य दिनी दारुपासुन मुक्तीसाठीचा हा लढा कुणाच्या सांगण्यावरुन नव्हे तर उस्फुर्त असा आहे हे येथे विशेष होय.