जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या निवडणुका
By Admin | Updated: April 5, 2017 17:35 IST2017-04-05T17:35:10+5:302017-04-05T17:35:10+5:30
जिल्ह्यातील ब आणि ड वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील निर्बंध उठविण्यात आले असून जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची निवडणूक होणार आहे.

जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या निवडणुका
जळगाव,दि.5- जिल्ह्यातील ब आणि ड वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील निर्बंध उठविण्यात आले असून जिल्ह्यातील 51 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची निवडणूक होणार आहे. यामध्ये 26 संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 25 संस्थांची अंतिम यादी आठवडाभरात प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र 4 फेब्रुवारी 2017 च्या शासन आदेशानुसार ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून मंजूर सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
यामध्ये 26 संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर असून यामध्ये 5 व 6 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहे. प्राप्त अर्जांची 7 रोजी छाननी होणार असून 10 रोजी ग्राह्य अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 10 ते 24 एप्रिल दरम्यान अर्ज मागे घेता येणार आहे. 25 रोजी अंतिम उमेदवारी याही जाहीर होऊन निशाणी वाटप केली जाणार आहे. त्यानंतर 7 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. मतमोजणीची तारीख संस्थानिहाय संस्थेच्या सूचना फलकावर निलडणूक कार्यक्रमासोबत जाहीर करण्यात येईल. निवडणूक निकाल मतमोजणीनंतर लगेच जाहीर करण्यात येणार आहे.