जळगाव : काहीही कारण नसताना घरात झोपलेल्या मोठ्या भावाला लहान भावाने मद्याच्या नशेत लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी पहाटे ४ वाजता बिस्मिल्ला चौक येथे घडली. शेख सादिक शेख सलिम (३४) असे जखमीचे नाव असून, त्यांच्या फिर्यादीवरून लहान भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबापुरा येथील बिस्मिल्ला चौक येथे शेख सादिक शेख सलिम हे आई कशिदाबी व लहान भाऊ टीपू ऊर्फ भय्या शेख सलिम यांच्यासह वास्तव्यास आहेत. मिस्तरी काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, लहान भाऊ हा कायम बाहेर राहत असल्यामुळे तो अधून-मधून घरी येत असतो. गुरुवारी (दि. १६) पहाटे ४ वाजता टीपू घरी आला. त्याने अचानक घरात झोपलेल्या शेख सादिक या मोठ्या भावावर हल्ला चढविला आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली. आईला जाग आल्यानंतर टीपूने तेथून पळ काढला. अखेर शेख सादिक यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानुसार लहान भाऊ टीपू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.