भोकरी येथील एकता बचत गट जाेपासतोय हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:16+5:302021-07-29T04:16:16+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : भोकरी येथील हिंदू व मुस्लिम समाजाच्या महिलांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी दि. १४ ऑगस्ट रोजी ...

भोकरी येथील एकता बचत गट जाेपासतोय हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा
वरखेडी, ता. पाचोरा : भोकरी येथील हिंदू व मुस्लिम समाजाच्या महिलांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी दि. १४ ऑगस्ट रोजी एकता बचतगट स्थापन केला.
माजी ग्रामपंचायत सदस्या राधाबाई भगवान चौधरी यांच्या संकल्पनेतून बारा महिला, यात सहा हिंदू आणि सहा मुस्लीम महिला मिळून या बचत गटाची स्थापना केली. एकमेकांच्या साहाय्याने एकमेकांचा विकास साधण्याच्या व एकमेकांच्या आर्थिक अडीअडचणी व इतर गरजा भागविण्याच्या उद्देशाने वाटचाल करीत हिंदू-मुस्लीम एकतेचे व जातीय सलोख्याचे आदर्श व जिवंत उदाहरण या बचत गटाने ठेवले आहे.
जातीयवादाने फोफावलेल्या वातावरणात बुरसटलेल्या विचारांच्या पलीकडे जाऊन प्रगल्भ विचारसरणीचा आदर्श दोन समाजाच्या समुदायांसमोर या बचत गटाने ठेवला आहे. यासाठी वरखेडी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत बचत खाते सुरू करून गटातील सर्व महिलांनी दरमहा १०० रुपये बचत खात्यात जमा केले. जमलेल्या रकमेतून गटातील सदस्य महिलांना अंतर्गत कर्ज वितरण केले जाते. यातून रोजगारनिर्मितीसह आर्थिक व्यवहाराचेदेखील ज्ञान मिळत आहे. यामुळे गटातील महिला व्यवहारकुशल बनल्या आहेत. बचत गटातील महिलांचे एकमेकांशी भावनिक नातेदेखील निर्माण झाले असल्याने एकमेकांच्या सुख-दु:खातदेखील आत्मीयतेने सामील होतात.
बचत गटाची यशस्वी वाटचाल बघून जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत एक लाख रुपयांचे साहाय्य कर्ज वाटप भोकरीचे ग्रामपंचायत सदस्य शे. इस्माईल शे. कासम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या महिला बचत गटास भोकरीचे सरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभते.
या बचत गटात अध्यक्षा धनश्री प्रकाश चौधरी, उपाध्यक्षा सुमय्या शकील काकर, सचिव फरजाना शे. शोएब काकर, सदस्य अलकाबाई शांताराम चौधरी, साजेदा मोहसीन काकर, रेखा संजय चौधरी, छाया बापू चौधरी, किरण विजय शुक्ला, जायदा लियाकत पठाण, पूनम दशरथ कुंभार, तसलीम मशीद काकर, परवीन अकील काकर या सदस्यांचा समावेश आहे.
280721\28jal_4_28072021_12.jpg
हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा जोपासणाऱ्या भोकरी येथील एकता महिला स्वयंसहाय्यता बचतगटास एक लाखाचे आर्थिक सहाय्य देताना