एकनाथराव खडसे राज्यात प्रचारासाठी जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:59 IST2019-04-23T16:57:43+5:302019-04-23T16:59:47+5:30
भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही.

एकनाथराव खडसे राज्यात प्रचारासाठी जाणार नाही
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी मंगळवारी सकाळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
खडसे यांच्यावर मागील आठवड्यात मोठी शस्त्रक्रिया झाली होती. अशातही ते आठवडाभर मतदारसंघात होते. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्या २४ रोजी खडसे पुन्हा पुढील उपचारासाठी मुंबई उपचारासाठी जात आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथील मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत महानंदच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर, शारदा चौधरी यांनी मतदान केले.
मतदान झाल्यानंतर त्यांनी संवाद साधताना सांगितले की, माझी मोठी शस्त्रक्रिया झाली. २० दिवस मी बॉम्बे हॉस्पीटलमध्ये होतो. गेल्या चार-पाच दिवसांपासून मी मतदारसंघात आलो होतो. अद्याप उपचार बाकी आहेत. उद्या पुढील उपचारासाठी मुंबईला जात आहे. प्रकृती अस्वास्थ्यास्तव मला राज्यात पुढील प्रचारासाठी जाता येणार नाही.