उपमहापौरांवरील गोळीबाराला वाळूची किनार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:18 AM2021-07-27T04:18:25+5:302021-07-27T04:18:25+5:30

जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेला गोळीबार क्रिकेटचा वाद मिटविण्याच्या कारणावरून सांगितले जात असले तरी पोलिसांनाही हे खरे ...

The edge of the sand on the shooting of the deputy mayor? | उपमहापौरांवरील गोळीबाराला वाळूची किनार ?

उपमहापौरांवरील गोळीबाराला वाळूची किनार ?

Next

जळगाव : उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेला गोळीबार क्रिकेटचा वाद मिटविण्याच्या कारणावरून सांगितले जात असले तरी पोलिसांनाही हे खरे कारण पटत नाही, त्यांच्याकडून मूळ कारणाचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत तपासात समोर आलेल्या वेगवेगळ्या कारणांपैकी वाळूच्या पैशाचीही किनार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, उमेश पांडुरंग राजपूत (वय २८) व किरण शरद राजपूत (वय २१) (दोन्ही रा.मयूर कॉलनी, पिंप्राळा) या दोघांना सोमवारी मालखेडा, ता.जामनेर येथून ताब्यात घेण्यात आले.

जिल्हा बँक कॉलनीतील मैदानावर रविवारी दुपारी दोन वाजता उमेश पाटील व नितीन भीमसिंग पाटील यांच्यात क्रिकेट खेळण्यावरून वाद झाल्याने उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पोलीस ठाण्यात वाद मिटविला होता. त्यावरून ही गोळीबाराची घटना झाल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत पैशाच्या जुन्या वादातून नितीन व भरत पाटील या दोघांना मारहाण केल्याचे उमेश पाटील याने फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पैशाचा वाद असल्याचे अधोरेखित झाले आहे.

पोलीस तपासात काय माहिती आली समोर

कुलभूषण पाटील हेदेखील पूर्वी वाळू व्यवसायात होते. महेंद्र पांडुरंग पाटील याने काही महिन्यांपूर्वी माहेजी, ता.पाचोरा येथे वाळूचा ठेका घेतल्याचे सांगितले जात आहे. तेथून उचल केलेली वाळू कुलभूषण यांच्या सांगण्यावरून काही जणांना देण्यात आली होती, त्याशिवाय आणखी एका ठिकाणी अशाच प्रकारे वाळू देण्यात आलेली होती, त्याचे पैसे कुलभूषण पाटील यांच्याकडे घेणे होते, मात्र त्यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचे एक कारण समोर आले आहे, त्याशिवाय उमेश याचा सिमेंट विक्रीचा व्यवसाय असून, त्याचे एक लाख रुपये नितीनकडे घेणे आहे, असेही सांगितले जात आहे. यात खरच तथ्य आहे का? की तपास भरकटण्यासाठी अशी माहिती पेरली जात आहे, याची पोलीस चौकशी करीत आहेत. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी सायंकाळी अटकेतील दोघांची वैयक्तिक चौकशी केली. तपास अजून सुरू असल्याने याविषयी अधिक बोलणे त्यांनी टाळले.

मालखेडा टेकडीवरून घेतले ताब्यात

गोळीबारानंतर सर्व जणांनी पुण्याला पळून जाण्याचा निर्णय घेतला, मात्र रात्रीतून विचार बदलला. उमेश व किरण दोघं जण मालखेडा, ता.जामनेर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी गुन्हे पथकाचे संजय सपकाळे, रवींद्र पाटील, शिवाजी धुमाळ, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे, विजय खैरे व उमेश पवार यांचे पथक रवाना केले. सायंकाळी दोघांना तेथून आणण्यात आले. दरम्यान, या गुन्ह्यातील जुगल बागुल, भूषण बिऱ्हाडे व महेंद्र राजपूत तिघं जण फरार आहेत. महेंद्र याने गोळीबार केल्याची माहिती अटकेतील दोघांनी दिली. महेंद्र व उमेश सख्खे, तर किरण मावसभाऊ आहेत. तिघंही उच्चशिक्षित असून, यापूर्वी कोणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. कोरोनाकाळात रुग्णालयात आईचे निधन झाल्याने उमेश याने रुग्णालयात तोडफोड केली होती, तेव्हा त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

कोट...

वाळू व्यवसायातून आपण वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो आहे. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही. यामागे राजकीय षडयंत्र आहे. कोणी तरी व्यक्ती या लोकांच्या पाठीशी असल्याने त्याच्या सांगण्यावरून हे घडवून आणण्यात आले आहे. यांच्याशी आपला कधीच संबंध आलेला नाही.

-कुलभूषण पाटील, उपमहापौर

कोट..

सर्वच शक्यता व मिळालेल्या माहितीची पडताळणी करणे सुरू आहे. अजून ठोस कारण समोर आलेले नाही. तपासात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल.

-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: The edge of the sand on the shooting of the deputy mayor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.