महाकाय प्रकल्पासाठी सर्वेक्षण वर्षभरात
By Admin | Updated: March 2, 2015 12:59 IST2015-03-02T12:59:46+5:302015-03-02T12:59:46+5:30
भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' मंजूर झाल्यास मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल.

महाकाय प्रकल्पासाठी सर्वेक्षण वर्षभरात
जळगाव : भूजल पातळी उंचावण्यासाठी राज्यभरासह देशात अभिनव ठरणार्या तापी आणि सातपुड्यादरम्यानच्या 'मेगा रिचार्ज' (महाकाय पुनर्भरण) प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी २१ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी गेल्या दीड वर्षापासून राज्य शासनाच्या अर्थमंत्रालयाकडे विचाराधीन आहे, हा निधी मंजूर झाल्यास वर्षभरात सर्वेक्षण पूूर्ण होईल आणि या महाकाय योजनेच्या कामाला गती येईल, असे आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्याच्या उत्तर भागात, तापी ते सातपुड्यादरम्यानच्या क्षेत्रात गेल्या ४0-५0 वर्षांपासून ऊस, केळी आदी पिकांसाठी भूजलाचा प्रचंड उपसा सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी १ ते २ मीटर पाणी पातळी खोल जात आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेऊन हे क्षेत्र गेल्या ५-६ वर्षांपासून 'डार्क झोन' म्हणून घोषित झालेले असून विहीर वा ट्यूबवेल करण्यावर निर्बंध आहेत.
हे क्षेत्र भूवैज्ञानिकांच्या दृष्टीने 'बझारा झोन' (भरपूर पाणी जमिनीत जिरणे, झिरपणे आणि काही तासात ते विहिरींना येणे) म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे हा प्रकल्प वरदान ठरणारा आहे.
त्यासाठी माजी खासदार व विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि तापी पाटबंधारे महामंडळाचे माजी अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहेत. राज्याचे जलसंधारणमंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न पाहता या प्रकल्पाला गती लाभेल, असे मानले जात आहे.
-------------------
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजीचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.डी.सिंग आणि त्यांचे साहाय्यक आर.पी.सिंग आणि केंद्रीय भूजल मंडळाचे संचालक पी.के.सिंग या जलतज्ज्ञांसह सुमारे १0 जणांच्या उच्चपदस्थांनी बुधवारी बर्हाणपूर ते चोपडा दरम्यानच्या क्षेत्राची पाहणी केली. त्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी.आर. भामरे, मुख्य अभियंता एम.एम. शिंदे आदींचाही समावेश होता. नंतर गुरुवारी या प्रकल्पासंबंधी जैन हिल्सला बैठकही झाली. खरिया घुटीला तापीवर वळण बंधारा बांधला जाईल, त्यातून तापीचे पाणी २३२ किलोमीटर लांबीच्या कॅनॉलने थेट चोपडा तालुक्याच्या पश्चिम टोकाला अनेर नदीपर्यंत जाईल. सातपुड्याच्या डोंगरात उगम पावणार्या नदी, नाल्यांमध्ये ते सोडले जाईल. याकामी भूसंपादन, पुनर्वसन जवळपास शून्य असेल, साहजिकच येत्या काही वर्षात हे पाणी भूगर्भात जिरून पाणी पातळी वाढून पूर्ववत होऊ शकेल. पाणीटंचाई इतिहासजमा होत वर्षभर पिके घेता येतील.