पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे ज्येष्ठ नागरिक ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:45+5:302021-03-04T04:29:45+5:30
०४ सीटीआर ०१ ०४ सीटीआर ०२ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना ...

पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे ज्येष्ठ नागरिक ताटकळले
०४ सीटीआर ०१
०४ सीटीआर ०२
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू असून बुधवारी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. दिवसभरात दोन ते तीन वेळा पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणींचा खोडा निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन् तास ताटकळत बसावे लागल्याचा प्रकारही घडला.
केंद्र शासनाने साठच्यावर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोफत केले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तिसऱ्या मजल्यावर बोलविले जाते. परिणामी, सुमारे पन्नास पायऱ्या चढून जाणे हे ज्येष्ठ नागरिकांना कष्टदायक जात आहे. त्यातच बुधवारी लसीकरणासाठी केंद्रात ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून प्रचंड गर्दी केली होती. टोकन दिल्यानंतर त्यांना लसीकरण केले जात होते. मात्र, दिवसभरात दोन ते तीन वेळा पोर्टल बंदची समस्या उद्भवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणासाठी आलो होतो, सायंकाळी क्रमांक लागल्याचा एका वृध्दाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्याची मागणी होत आहे.
लसीकरण केंद्र दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर लसीकरण केंद्र सुरू आहे. तिसऱ्या मजल्यावर केंद्र असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात लसीकरण केंद्र दुसरीकडे हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. लसीकरण केंद्रासाठी शहरातील काही केंद्रांची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.