राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली, ५० टक्के प्रवासीही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:20 IST2021-08-21T04:20:48+5:302021-08-21T04:20:48+5:30
सचिन देव जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यात रक्षाबंधन जवळ आल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रत्येक मार्गावर ...

राखी पौर्णिमेमुळे बसेसची संख्या वाढली, ५० टक्के प्रवासीही वाढले
सचिन देव
जळगाव : अनलॉकनंतर प्रवाशांची संख्या वाढू लागल्याने आणि त्यात रक्षाबंधन जवळ आल्यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाने प्रत्येक मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत. त्यात दोन दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे, औरंगाबाद, नाशिक, धुळे या मार्गावर जादा बसेस सुरू केल्या आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाही महामंडळाची बससेवा मार्च ते मेपर्यंत बंद होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, महामंडळातर्फेही टप्प्याटप्प्याने बससेवा सुरू करण्यात आली. मागील महिन्यापासून परराज्यातही बससेवा सुरू केली आहे, तर आता १५ ऑगस्टपासून शासनाने सर्वत्र अनलॉक केल्यामुळे, पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक मार्गावर दर तासाला फेऱ्या सुरू केल्या आहेत, तसेच आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, धुळे, चाळीसगाव, मालेगाव. यासह सूरत, अंकलेश्वर या मार्गावरही जादा बसेस सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रवाशांसाठी ऑनलाइन आरक्षणाचींही सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे घरी बसूनही बसचे तिकीट बुकिंग करता येणार असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- हावडा एक्स्प्रेस
- काशी एक्स्प्रेस
- कामायनी एक्स्प्रेस
- सेवाग्राम एक्स्प्रेस
इन्फो :
या मार्गावर वाढविल्या फेऱ्या
जळगाव ते औरंगाबाद
जळगाव ते नाशिक
जळगाव ते धुळे
जळगाव ते पुणे
इन्फो
प्रवाशांची गर्दी वाढली
- सध्या रेल्वे गाड्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळेही अनेक प्रवासी बसेसचा आधार घेत आहेत. त्यामुळे नाशिक, औरंगाबाद, धुळ्यासह पाचोरा, चाळीसगाव, धरणगाव या मार्गांवरही प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
- तसेच शनिवारी सुट्टी व रविवारी रक्षाबंधन असल्यामुळे नोकरदार वर्ग एक दिवस आधीच आपल्या मूळगावी किंवा बहिणींकडे रवाना होत आहेत, तसेच खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येत असल्यामुळे, बसेसला गर्दी वाढली असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
शासनाने १५ ऑगस्टपासून अनलॉक केल्यानंतर, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे बसेसला गर्दी होत असून, त्यात रक्षाबंधनामुळे ५० टक्क्यांपर्यंत प्रवाशांची संख्या वाढली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुविधेसाठी जळगाव आगारातर्फे अनेक मार्गावर जादा बसेस सोडण्यात येत आहेत.
- नीलेश पाटील, व्यवस्थापक, जळगाव आगार.