नैसर्गिक प्रवाह अडवल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:44+5:302021-09-10T04:22:44+5:30
अमळनेर : बंद केलेल्या नाल्यांमुळे शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेल्याने शहरातील कॉलन्यांमध्ये पाणी शिरले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी ...

नैसर्गिक प्रवाह अडवल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले
अमळनेर : बंद केलेल्या नाल्यांमुळे शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेल्याने शहरातील कॉलन्यांमध्ये पाणी शिरले असून पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक वर्षांपासून गटारी नसल्याने या समस्या उद्भवल्या आहेत.
शहराच्या दक्षिणेस अनेक कॉलनी भागात नाला अरूंद केल्याने जादाचा पाऊस झाल्याने ते पाणी नाला ओलांडून कॉलनी परिसरात घुसले.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पिंपऱ्या नाल्यावर काही प्लॉट व्यवसायिकांनी ९ मीटरचा नाला अरूंद केल्याची तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही म्हणून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रसाद नगर भागात पाण्यातून मोटारसायकलदेखील जाऊ शकत नव्हती. अनेक घरच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी साचले होते. तीच बाब पिंपळे रोडवर घडली आहे.
प्लॉटधारक, दुकानदारांनी नाले बुजल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केली आहे. त्यांच्याविरुद्ध मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६प्रमाणे कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व विभागांकडे केली आहे तसेच बांधकामास परवानगी देणाऱ्या अभियंत्यांची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे.
शहराच्या पश्चिमेकडून येणाऱ्या शेतातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अरुंद केल्याने एलआयसी कॉलनी, क्रांतीनगर, टेलिफोन कॉलनी, विठ्ठल नगर आदी भागात दुसऱ्या दिवशी देखील गुडघाभर पाणी साचले होते.
या भागात अनेक वर्षांपासून गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. पालिका आणि महसूल प्रशासनाने योग्य नियोजन करून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अन्यथा वारंवार पाणी साचल्याने घरे कमकुवत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
090921\09jal_7_09092021_12.jpg
पालिका व महसूल प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची मागणी