बिल न भरल्याने कासोदा पाणीयोजनेचा वीजपुरवठा कापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST2021-06-18T04:12:59+5:302021-06-18T04:12:59+5:30
दर महिन्यात हा वीजपुरवठा खंडित होत असतो, हे विशेष. येथे व वनकोठा, बांभोरी, वसाका वसाहत, आडगाव, तळई व जवखेडा ...

बिल न भरल्याने कासोदा पाणीयोजनेचा वीजपुरवठा कापला
दर महिन्यात हा वीजपुरवठा खंडित होत असतो, हे विशेष. येथे व वनकोठा, बांभोरी, वसाका वसाहत, आडगाव, तळई व जवखेडा या गावांतील एकूण लाखांच्यावर लोकसंख्येला गिरणा नदीपात्रातील दहिगाव बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीयोजनेला उत्राण व कासोदा अशा दोन युनिटमधून वीजपुरवठा होतो. उत्राण युनिटची थकबाकी ९३,९२,०७० रुपये, तर कासोदा युनिटची २५,०३,१८० रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्याने वीज मंडळाने ही कारवाई केली आहे. ही अशी कारवाई दर महिन्याला होत असते. पैसे जमवाजमव करण्यासाठी १०/१२ दिवस जातात. नंतर थोडेफार बिल भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू होतो. एकदा नळांना पाणी आल्यानंतर किमान ८/१० दिवसांनंतर परत पाणी येते. तोपर्यंत पून्हा वीजपुरवठा कापला जातो. नंतर, तो १०-१२ दिवस जोडला जात नाही, हे नित्याचेच झाले आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री योगायोगाने पाणीपुरवठामंत्री पण आहेत. या योजनांच्या वीजबिलाची रक्कम भरण्याची दर महिन्याला ग्रामपंचायतींना मोठी कसरत करावी लागते. या नेहमीच उद्भवणा-या या गंभीर समस्येवर तमाम सरपंचांनी पालकमंत्र्यांकडून कायमस्वरूपी तोडगा काढून जनतेचे हाल थांबवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.
कोट
कोरोनाकाळात व्यवसाय व मोलमजुरी ठप्प झाल्याने वसुली होत नाही. योजना जीर्ण झाल्याने दुरुस्तीचा मोठा खर्च होतो. कर्मचाऱ्यांचे पगार व मजुरीचा खर्च होतो, पण वसूल नसल्याने वीजबिल भरण्यात अडचणी येत आहेत. जिल्हाभरातील सर्वच ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा आज कापला गेला आहे. परंतु, लवकरच पैशांची तजवीज करून वीजबिल भरून पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- उमेश पाटील, सरपंच, वनकोठा