निष्काळजीपणामुळे पं. स.ची मालमत्ता होतेय भग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:23 IST2021-06-16T04:23:07+5:302021-06-16T04:23:07+5:30
अमळनेर : पंचायत समितीच्या मालकीचा सभापती बंगला, व्यापारी संकुल आणि सभागृह आदी बंद असल्याने त्यांची दुरवस्था होत असून, पदाधिकारी ...

निष्काळजीपणामुळे पं. स.ची मालमत्ता होतेय भग्न
अमळनेर : पंचायत समितीच्या मालकीचा सभापती बंगला, व्यापारी संकुल आणि सभागृह आदी बंद असल्याने त्यांची दुरवस्था होत असून, पदाधिकारी व अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे मालमत्तेचे नुकसान होत आहे.
धुळे चोपडा राज्य मार्ग १५ लगत बसस्थानकाच्या शेजारी पंचायत समितीचे व्यापारी संकुल बंद असल्याने पंचायत समितीचे उत्पन्न बुडत आहे. काही वर्षांपूर्वी ही दुकाने बचत गटांना भाडे तत्वावर देण्यात आली होती. अत्यल्प भाडे असतानाही काही बचत गटांनी पोटभाडेकरू, काहींनी दुसऱ्यालाच जादा भाड्याने दिली होती. मुदत संपूनही दुकाने खाली न करता भाडे भरत नसल्याने ही दुकाने खाली करण्यात आली होती.
पुन्हा भाड्याने देणे नाहीच
मात्र, नंतर दीड वर्षे उलटली तरी ही दुकाने भाड्याने देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पंचायत समितीचे आर्थिक नुकसान होत आहे. अमळनेर पंचायत समितीला कायम गटविकास अधिकारी नाही आणि सदस्यांचे अज्ञान अथवा दुर्लक्ष यामुळे मालमत्तेकडे दुर्लक्ष होत आहे. याच व्यापारी गाळ्यांवर लाखो रुपये खर्च करून सभागृह बांधण्यात आले आहे. परंतु वापर, देखभाल आणि दुरुस्तीअभावी त्याची भग्न अवस्था झाली आहे. एका बैठकीव्यतिरिक्त त्याचा वापर झाला नाही. अनैतिक कृत्यासाठी त्याचा वापर होत असल्याची चर्चा आहे. तीच गत शेजारील सभापती बंगल्याची झाली आहे. तत्कालीन सभापती विवेक पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर एकही सभापती या बंगल्यात राहायला आला नाही. लघुशंका, सिगारेट ओढणे आणि दारू पिण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे समजते. मुख्य रस्त्यावरील करोडो रुपयांची मालमत्ता पंचायत समिती सदस्यांचे दुर्लक्ष व अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा यामुळे निरुपयोगी झाली आहे.
धुळे रोडवरील पंचायत समितीच्या मालकीची बंद असलेली दुकाने. छाया अंबिका फोटो १६सीडीजे १