अधिक मासामुळे नवरात्रोत्सव लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 22:01 IST2020-09-22T22:01:12+5:302020-09-22T22:01:19+5:30
उत्सवाबाबत शासन निर्देशाची मंडळांना प्रतीक्षा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीबाबत पदाधिकारी पडले संभ्रमात

अधिक मासामुळे नवरात्रोत्सव लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड
रावेर : पितृपक्षातील सर्वपित्री अमावस्येची रात्र पालटली म्हणजे आदिशक्ती कुलस्वामिनी जगदंबेच्या नवरात्रौत्सवाची सुरू होणारी लगबग यंदा अश्विन अधिक मासामुळे महिनाभर लांबणीवर पडली आहे. यातच कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवरात्रौत्सव साजरा करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतीही आचारसंहिता घालून देणारे निर्देश अद्याप पारीत झाले नसल्याने दुर्गोत्सव मंडळे थंड बस्त्यात असून नियोजनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या साथरोगाच्या महामारीने कळस गाठला असल्याने यंदा गणेशोत्सवात शासनाने मूर्तीची उंची, प्रतिष्ठापना, आरती व विसर्जनासंबंधी सक्त निर्बंध घालून दिले होते. त्या अनुषंगाने नवरात्रौत्सवातही निर्बंध असतील हे निश्चत आहे. मात्र शासनाने यासंबंधी स्वयंस्पष्ट असे निर्देश अजून दिलेले नाहीत.
तालुक्यातील रावेर पोलीस स्टेशनतंर्गत ४१ सार्वजनिक तर २० खासगी, सावदा पोलीस स्टेशनअंतर्गत ६० सार्वजनिक तर निंभोरा पोलीस स्टेशनअंतर्गत ३६ सार्वजनिक व २८ खासगी अशा १८५ दुर्गोत्सव मंडळांनी आदिशक्ती दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली होती.
कमी उंचीच्या मूर्र्तींची बुकींग
काही दुर्गोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवाप्रमाणे दुगार्मातेच्या मूर्ती कमी उंचीच्याच बुकींग करण्यास सुरुवात केली आहे. काही दुर्गोत्सव मंडळांनी नवीन मूर्ती खरेदीवर हकनाक खर्च न करता तालूका व जिल्हा परिसरातील दुगार्मंडळांच्या चित्ताकर्षक व मनोहारी अशा दुर्गा देवीच्या मूर्र्तींचे केवळ स्थळ विसर्जन करून मानाचे श्रीफळ व त्या मंडळाला अपेक्षीत असलेली श्रीफळावरची २५१ वा ५०१ प्रमाणे दक्षिणा अदा करून मुर्तींचे हस्तांतरण करून गतवर्षीच्याच देवीच्या मुर्ती राखून ठेवल्या आहेत . मात्र अशा बहूतांश मुर्ती पाच ते सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असल्याने या उंचीच्या मुर्त्यांना शासनाची परवानगी मिळणार की नाही? ही बाब अद्याप अधांतरी असल्याने त्या मुर्तींना रंगकाम करून नुतनीकरण करण्याचे काम प्रतिक्षेत आ वासून आहे. दरम्यान यंदा नवरात्रत्सवातील दांडियाचा तरुणांचा आवडता कार्यक्रम हा रद्दच होण्याची शक्यता असल्याने या उत्सवाबातचा उत्साह ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे.