उपचाराअभावी दुभती गाय दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:44+5:302021-07-28T04:17:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुऱ्हाड, ता. पाचोरा : कुऱ्हाड बुद्रुक येथील शेतकरी उत्तम परभत पाटील यांच्या मालकीची गावरान गाय ...

उपचाराअभावी दुभती गाय दगावली
लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हाड, ता. पाचोरा : कुऱ्हाड बुद्रुक येथील शेतकरी उत्तम परभत पाटील यांच्या मालकीची गावरान गाय उपचाराअभावी मंगळवारी दुपारी मरण पावली. या गायीने शेतात दोन-चार दिवसांपूर्वी काहीतरी विषारी पदार्थ खाल्ल्याने त्या दिवसांपासून आजारी पडली होती.
गाईच्या मालकाने दोन दिवसांपासून विविध गावांच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांना विनवणी करून गाय आजारी पडल्याचे सांगितले. परंतु डॉक्टरांनी संप सुरू असल्याचे कारण दाखवित असमर्थता दर्शविली. यातच गाईने मंगळवारी दुपारी प्राण सोडला. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे ३० हजारांचे नुकसान झाले आहे.
गाईसोबत लहान वासरू आहे. दररोज सहा ते सात लिटर दूध देणारी गाय मरण पावल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गाय आजारी पडल्यापासून मी सतत खासगी पशू डॉक्टरांच्या संपर्कात होतो. शेवटी कुऱ्हाड अंतर्गत येणाऱ्या अंबेवडगाव येथील सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क केला असता त्यांनी त्या ठिकाणी येण्यास सांगून औषधोपचार लिहून देण्याचे कारण सांगितले; पण संप सुरू असल्याच्या कारणामुळे गायीजवळ येण्यास या डॉक्टरांनी नकार दर्शविला, असे शेतकरी उत्तम पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.