पाट्या नसल्याने फापोरे साठवण बंधाऱ्यातून पाणी जातंय वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:58+5:302021-09-04T04:20:58+5:30
अमळनेर : तालुक्यातील फापोरे बु. येथील साठवण बंधाऱ्यास ठेकेदाराला बिल मिळाले नसल्याने त्याने पाट्या टाकलेल्या नाहीत म्हणून लाखो लिटर ...

पाट्या नसल्याने फापोरे साठवण बंधाऱ्यातून पाणी जातंय वाहून
अमळनेर : तालुक्यातील फापोरे बु. येथील साठवण बंधाऱ्यास ठेकेदाराला बिल मिळाले नसल्याने त्याने पाट्या टाकलेल्या नाहीत म्हणून लाखो लिटर पाणी या बंधाऱ्यातून वाहून जात असल्याने पैसे खर्च होऊनही उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बंधाऱ्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता ही मृद व जलसंधारण विभागाकडील विशेष निधी लेखाशीर्ष ४ ४०२२६८१ - ५३ या अंतर्गत सन २०१८-१९ या वर्षाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आली होती. त्यावेळी कामाची किंमत ८४ लाख होती. सदर लेखाशीर्ष जिल्हा नियोजन समितीचे नाही. जलयुक्त आराखडा पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात येत होता. सदर लेखाशीर्ष शासनाने मार्च २० पासून बंद केल्यामुळे या लेखाशीर्षाखाली शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही. मात्र, खोलीकरण वाढल्याने या कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली व कामाची एकूण किंमत १ कोटी ५१ लाख रुपये झाली होती.
८० टक्के काम पूर्ण
सदर काम ठेकेदाराने बंधाऱ्यांचे बांधकाम ८० टक्के पूर्ण केले असून, संबंधीस ठेकेदारास त्याच्या कामाचा मोबदला फक्त ७६ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे सदर साठवण बंधाऱ्याच्या पाट्या टाकल्या जात नाहीत. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नदीकाठावरील फापोरे बु., कन्हेरे, फापोरे खु., बिलखेडा या गावांना भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.
----
शासनाने निधी न दिल्याने काम रखडले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने पाट्या तयार करण्याचे काम सुरू आहे. पाट्या टाकून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला जाईल-अनिल पाटील, ठेकेदार
---
ग्रामीण पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांना सांगून शासनाकडे नवीन प्रस्ताव पाठवून दुसऱ्या योजनेतून निधी आणून बंधाऱ्याचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांची समस्या सोडविण्याचा पाठपुरावा सुरू आहे.
- अनिल भाईदास पाटील, आमदार, अमळनेर विधानसभा मतदारसंघ
बोरी नदीला आलेल्या पुरामुळे फापोरे बंधाऱ्यातून पाणी वाहून जातेय. (
छाया अंबिका फोटो अमळनेर)