लोकनियुक्त सरपंच निवड रद्दमुळे अनेकांचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:11 IST2020-01-04T21:11:02+5:302020-01-04T21:11:15+5:30
पुन्हा नव्याने तयारी । ग्रामीण भागात राजकारणाला नवे वळण

लोकनियुक्त सरपंच निवड रद्दमुळे अनेकांचे स्वप्न भंगले
महिंदळे, ता.भडगाव : सप्टेंबर २०२० मध्ये मुदत संपणा?्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे ग्रामीण भागात वाहण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच निवड होणार म्हणून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून मोर्चेबांधणीलाही सुरुवात केली होती. परंतु लोकनियुक्त सरपंच निवड रद्द झाल्याने व सरपंच निवड सदस्यांमधून होईल हे जाहीर केल्याने लोकनियुक्त सरपंच निवडणूक लढवण्याचे अनेकांचे स्वप्न भंग झाले.
आता वॉर्ड रचना आपल्या सोईनुसार कशी करता येईल यासाठी गावपुढारी तयारीला लागले आहेत. प्रथमच लोकनियुक्त सरपंच निवड होत असल्याने उमेदवार विविध माध्यमांद्वारे समोर येत होते. परंतु या निर्णयामुळे आता नवीन रणनीती सुरु झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा भाऊबंधकीवर व आर्थिक बळावर निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. सदस्यांमधून सरपंच निवड झाल्यास ग्रामीण भागात कधीकधी पाच वर्षात पाच सरपंच होतात तर काहींना अविश्वासाला सामोरे जावे लागते.
मतदारांचा अपेक्षा भंग
लोकनियुक्त सरपंच निवड होणार व निवडणूक चुरशीची होणार या उत्साहात मतदार आपापल्या परीने आपला उमेदवार लोकनियुक्त सरपंचसाठी कसा योग्य आहे हे पटवून देताना दिसत होते. परंतु सरकारच्या लोकनियुक्त सरपंच निवड रद्दच्या निर्णयामुळे मतदारांचा अपेक्षा भंग झाला.