The 'dry bait' of the Chalisgaon area is known as Kadadla | चाळीसगाव परिसरात ‘कोरडा चारा’ कडाडला
चाळीसगाव परिसरात ‘कोरडा चारा’ कडाडला

ठळक मुद्देअत्यल्प पर्जन्यमानामुळे बिकट परिस्थितीदुष्काळाचा वणवा पेटल्याने चारा-पाण्याची मोठी टंचाईचाळीसगाव परिसरात जनावरांची संख्या मोठीपशुपालकांची चाऱ्यासाठी परजिल्ह्यात भटकंतीहिरवा चारा करावा लागतो अ‍ॅडव्हान्स बुकींगचारा छावण्या सुरू करण्याची मागणी, पशुपालक व शेतकरी हतबल

चाळीसगाव, जि.जळगाव : यंदा पर्जन्यमानाने सरासरी न गाठल्याने डिसेंबरपासूनच जलसंकट गडद झाले असून, सद्य:स्थितीत जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाऱ्याचे भाव चांगलेच कडाडले आहे. थेट अक्कलकुवा, नंदुरबार परिसरातून चारा येथे येत असून, दोन हजार ८०० रुपये शेकडा अशी उसळी त्याने घेतली आहे. पुढील महिन्यात हे भाव तीन हजाराच्या पुढे जातील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
चाळीसगाव परिसरात दूध-दुभत्याचा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक घरटी जनावरे दावणीला बांधलेली असतात. शेतीला जोडधंदा म्हणूनही शेतकरी पशुपालन करतात. त्यामुळे जनावरांची संख्याही मोठी आहे. यंदा मात्र चारा आणि पाणी समस्येने पशुपालकांना मेटाकुटीला आणले आहे. चाºयाच्या शोधात शेतकऱ्यांना परजिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे.
यावर्षी पावसाळ्यात आभाळमाया फारशी बरसली नाही. पावसाच्या हजेरीपेक्षा गैरहजेरीच अधिक होती. परतीच्या पावसानेही निराशा केल्याने रब्बी हंगामात शेतकºयांच्या झोळीत फारशे काही पडले नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य गहिरे झाल्याने चाºयाचीदेखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यात पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. चारा आणि पाण्याच्या समस्येचा दुधाच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याची कैफियत पशुपालक मांडतात. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात बहुतांशी विहिरी आटल्या आहेत. जनावरांना काय खाऊ घालायचे, असा प्रश्न पशुपालकांना भेडसावत आहे. हिरवा चाºयाची तर अ‍ॅडव्हान्स बुकींग करावी लागत आहे.
कोरड्या चाºयाची मागणी वाढली
चारा उपलब्ध नाही. त्यातच हिरवा चारा अल्प असल्याने कोरड्या (शाळू व ज्वारी) चाºयाची मागणी वाढली आहे. पशुपालक थेट परजिल्ह्यात चारा घेण्यासाठी जात आहे. शहरात हिरापूर रोड परिसरात अक्कलकुवा, नंदुरबार भागातून कोरडा चारा विक्रीसाठी आणला जात असून, त्याचे भाव यंदा वधारले आहे. २८०० रुपये प्रतिशेकडा अशा चढ्या दराने कोरडा चारा विक्री होत असून, पुढील महिन्यात हे भाव तीन हजाराहून अधिक असणार आहेत.

शासनाने पशुपालक व जनावरे पाळणाºया शेतकºयांचा अंत पाहू नये. तालुक्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे. तत्काळ जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात. पशुपालकांना चारा उपलब्ध करुन द्यावा. ग्रामीण भागात पाणीबाणी आहे. दावणीला बांधलेल्या जित्राबाला काय खाऊ घालायचे? या प्रश्नाने पशुपालक खचले आहेत.
- भूषण काशिनाथ पाटील
सदस्य, जि.प. व जिल्हा नियोजन मंडळ
 


Web Title: The 'dry bait' of the Chalisgaon area is known as Kadadla
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.