नशेत लाथ मारणे पडले महाग
By Admin | Updated: May 7, 2014 08:09 IST2014-05-07T01:49:58+5:302014-05-07T08:09:30+5:30
दारुच्या नशेत महिलेला लाथ मारणे एका तरुणाला भलतेच महागात पडले असून महिलेच्या मृत्यूप्रकरणी तरुणावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नशेत लाथ मारणे पडले महाग
नशेत लाथ मारणे पडले महाग तळोदा : अकस्मात मृत्यूनंतर दाखल झाला मनुष्यवधाचा गुन्हा
रमेशकुमार भाट, तळोदा
दारूच्या नशेत एकाने काहीही कारण नसताना एका महिलेला लाथ मारली आणि हीच लाथ मारणे त्या व्यक्तीला किती महागात पडले याचा प्रत्यय त्याला नुकताच आला. महिलेच्या अकस्मात मृत्यूची घटना दाखल करण्यात आल्यानंतर या घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रानुसार, लीलूबाई शिड्या मोरे (५२) रा.गढीकोठडा, ता.तळोदा ही आपल्या मुलासह ३ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता बाजार करण्यासाठी तळोदा शहरात आली होती. ती भन्साली प्लाझा या गजबजलेल्या ठिकाणी उभी होती. तेव्हा दिलीप रामा वळवी (२७) रा.पाडली, ता.धडगाव या व्यक्तीने काहीही कारण नसताना दारूच्या नशेत तिला लाथ मारली. तिला लागूनच एक मोटारसायकल उभी होती अन् ही महिला त्या मोटारसायकलवर पडली. त्यात तिच्या डोक्याला जबर दुखापत होऊन ती बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नंदुरबार येथे दाखल करण्यात आले व तेथून पुन्हा धुळे व धुळ्याहून औरंगाबाद रुग्णालयात जीव वाचविण्यासाठी नेत असतानाच ४ मे रोजी दुपारी अडीच वाजता या महिलेचा रस्त्यातच मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची खबर तिचे नातलग मोहनसिंग गोरजी पाडवी रा.रोझवा, ता.तळोदा यांनी दिली. प्रारंभी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. त्यावरून पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आर.एस. वावरे, आनंदराव पाटील, मक्कन शिंदे, दीपक गोरे यांनी चौकशी करून मयत महिलेला लाथ मारणारा दिलीप रामा वळवी, रा.पाडली, ता.धडगाव याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर.एस. वावरे, सहायक फौजदार मक्कन शिंदे, हवालदार आनंदराव पाटील, दीपक गोरे करीत आहेत.