दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:26+5:302021-05-05T04:27:26+5:30
खुबचंद साहित्या नगर : लोकप्रतिनिधींची आश्वासने कागदावरच लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या ...

दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई
खुबचंद साहित्या नगर : लोकप्रतिनिधींची आश्वासने कागदावरच
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर खुबचंद साहित्या नगरमध्ये नागरी वस्ती वाढली. मात्र, इतक्या वर्षांत रस्ते, गटारी तर सोडा, साधी पिण्याच्या पाण्याचीही समस्या सुटली नसल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्यासाठी अनेकवेळा मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या न सुटल्याने उन्हाळ्यात आता पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याची खंत येथील रहिवाशांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केली.
शहराला लागून असलेल्या खुबचंद साहित्या नगरमध्ये मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. शहरापासून दूर,नैसर्गीक आणि प्रदूषणमुक्त हा भाग असल्याने नागरिकांचा दिवसेंदिवस या भागात रहिवास वाढत आहे. मात्र, आज ना उद्या समस्या सुटतील, या आशेने या भागातील नागरी वस्ती वाढतच आहे; परंतु दहा वर्षांपासून पाणी, रस्ते आणि गटारींची समस्या आजही ‘जैसे थे’ आहे. नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी वापरावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल नाही, त्या नागरिकांना बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. वर्षानुवर्षं अशा प्रकारचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे उन्हाळ्यात तर बहुतांश नागरिकांच्या बोअरवेलच्या पाण्याचा साठा कमी होतो. यामुळे पिण्याचे पाणीही मिळेनासे होते. त्यामुळे जारने बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत असल्याचेही या भागातील रहिवाशांनी सांगितले. तसेच या ठिकाणी रस्ते आणि गटारी नसल्याने पावसाळ्यात खूपच हाल होत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
लोकप्रतिनिधी आश्वासन देऊन वेळ मारून नेतात
या भागातील रहिवाशांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक पुढारी या भागात आले. त्यांना येथील समस्यांबाबत अनेक वेळा सांगितले, त्यांनी निवडणुका झाल्यानंतर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, निवडून आलेले लोकप्रतिनिधी करतो करतो, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याची खंतही या नागरिकांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी रस्ते व गटारींची समस्या सोडवली नाही तरी चालेल. मात्र, पाण्याची समस्या लवकर सोडविण्याची अपेक्षाही या नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
गेल्या अनेक वर्षांपासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, ना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली ना रस्ते, गटारींची. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने जार विकत आणून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे.
राजेंद्र पाटील, रहिवासी
पाण्याच्या समस्येबाबत जळगाव मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, अद्यापही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. रहिवाशांना यामुळे बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलचेही पाणी कमी होत असल्याने आम्हा रहिवाशांना बाहेरून विकतचे पाणी आणावे लागत आहे.
चंद्रकांत मोरे,रहिवासी
पाणीटंचाईचा सर्वात मोठा महिलांना करावा लागतो. घरात पाणी नसल्याने इतर कामेही अडून पडतात. त्यामुळे या भागातील पाणीटंचाईच्या समस्येचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सुमन राठोड, रहिवासी
या भागात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला बोअरवेलच्या पाण्याशिवाय दुसरी व्यवस्था नाही. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.
कलाबाई पाटील, रहिवासी