डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:22 IST2021-08-21T04:22:02+5:302021-08-21T04:22:02+5:30
जळगाव : डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुनर्परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून वैष्णवी किशोर लोखंडे (२२) या ...

डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
जळगाव : डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुनर्परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून वैष्णवी किशोर लोखंडे (२२) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाजवळील गुरू कॉलनी येथे घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैष्णवी ही गुरू कॉलनी येथे वडील किशोर, आई सविता आणि लहान भावासह वास्तव्यास होती. ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रथम वर्षाच्या परीक्षेत ती नापास झाली होती. मात्र, विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेच्या माध्यमातून पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी संधी दिली जाते. तिने ही परीक्षा दिली होती. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र, त्यात कमी गुण मिळाल्याने नापास झाली. याचा आघात तिच्या मनाला बसल्याने सायंकाळी आई-वडील घराच्या खालच्या मजल्यावर असताना, तिने वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळेनंतर हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी मुलीला गळफास घेतल्याचे पाहून आक्रोश केला. या घटनेमुळे त्यांना जबर धक्का बसला. सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी सीएमओ डॉ. नीता पवार यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी हिचे आई-वडील हे शिक्षक आहेत.
शिक्षकांसह सहकारी विद्यार्थ्यांनी घेतली धाव
वैष्णवी हिने आत्महत्या केल्याची बातमी समजल्यानंतर शिक्षकांसह सहकारी विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह ताब्यात देण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेनंतर घराची झडती घेतली. उशिरापर्यंत सुसाईड नोट किंवा अन्य वस्तू आढळून आल्या नव्हत्या.
डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमधील दुसरी घटना
डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेजमध्ये काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. सहकारी मैत्रिणींकडून झालेल्या त्रासातून त्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा त्या वेळी आरोप होता. त्यानंतर या काॅलेजच्या दुसऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. त्या वेळी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता.
कोट
वैष्णवी ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होती. मात्र त्या वेळी ती नापास झाली होती. पुनर्परीक्षेची तिला संधी मिळाली होती. मात्र त्यातही तिला अपयश आले होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली असावी.
- प्रमोद भिरूड, प्रशासन अधिकारी, डाॅ. उल्हास पाटील मेडिकल काॅलेज