सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे डॉ. हिराणी यांची गिनिज बुकात नोंद
By Admin | Updated: March 20, 2017 00:26 IST2017-03-20T00:26:02+5:302017-03-20T00:26:02+5:30
सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे जळगावातील धावपटू तथा जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ. रवी हिराणी यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे डॉ. हिराणी यांची गिनिज बुकात नोंद
जळगाव : तब्बल २१ कि.मी. घाट असलेली सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणारे जळगावातील धावपटू तथा जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ. रवी हिराणी यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी १८ सप्टेंबर २०१६ रोजी सातारा येथे सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होेते. पाचवे वर्ष असलेल्या या मॅरेथॉनमध्ये ४०८१ स्पर्धक धावले होते. यात विविध भागातील स्पर्धक सहभागी झाले होते तर जळगावातून केवळ डॉ. रवी हिराणी यांनी सहभाग नोंदविला होता.
१७०० फूट उंच घाट
एरव्ही ज्या मॅरेथॉन होतात त्या सरळ जमिनीवर धावण्याच्या असतात. मात्र ही स्पर्धा होती ती घाट चढून धावण्याची. तब्बल १७०० फूट उंच असलेला हा घाट धावणे म्हणजे २१ कि.मी.चा चढ-उतार आहे. तसे पाहता विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणारे डॉ. हिराणी यांनी या हिल मॅरेथॉनमध्ये सहभागाचा निश्चय केला व ती पूर्णही केली.
यासाठी झाली नोंद
या स्पर्धेत एवढ्या मोठ्या (४०८१) प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने हा एक विक्रम ठरला. त्यामुळे या स्पर्धेतील स्पर्धकांची गिनिज वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली व त्यात जळगावच्या डॉ. रवी हिराणी यांचा समावेश आहे.
यशाचे श्रेय
या यशाचे श्रेय जळगाव रनर्स गु्रपचे किरण बच्छाव, विक्रांत सराफ, अविनाश काबरा, नीलेश भांडारकर, नरेंद्रसिंग सोलंकी यांना असल्याचे डॉ. रवी हिराणी यांनी सांगितले. या शिवाय सरावासाठी मदत करणारे त्यांचा लहान बंधू यश हिराणी, ज्ञानेश्वर बढे यांनीही मदत केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. धावण्याची प्रेरणा पत्नी डॉ. ज्योती हिराणी यांच्याकडून मिळाल्याने मी धावू लागलो व इथपर्यंत पोहचल्याचे डॉ. हिराणी यांनी सांगितले.
घाटामध्ये धावून केला सराव
या मॅरेथॉनसाठी सराव आवश्यक असल्याने डॉ रवी हिराणी यांनी फर्दापूर ते अजिंठा दरम्यानचा घाट, पाल ते खिरोदा दरम्यानचा घाट धावून चढले तसेच विद्यापीठ परिसरातील चढ-उतारावर धावूनही त्यांनी सराव केला.