श्रावणमासात हनुमान मंदिराची कवाडे ठेवली जातात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:11+5:302021-08-24T04:20:11+5:30

रावेर : श्रावण मासातील धार्मिक सण व व्रतवैकल्यांची पर्वणी पाहता शिवभक्ती, दुर्गाभक्ती, गुरुदत्त तथा श्री हनुमान भक्ती सर्वत्र फुलत ...

The doors of Hanuman temple are kept closed during Shravanmas | श्रावणमासात हनुमान मंदिराची कवाडे ठेवली जातात बंद

श्रावणमासात हनुमान मंदिराची कवाडे ठेवली जातात बंद

रावेर : श्रावण मासातील धार्मिक सण व व्रतवैकल्यांची पर्वणी पाहता शिवभक्ती, दुर्गाभक्ती, गुरुदत्त तथा श्री हनुमान भक्ती सर्वत्र फुलत आहे. अशात तालुक्यातील खानापूर येथील श्रीराम मंदिरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराची कवाडे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याची अतिप्राचीन परंपरा जोपासली जात आहे.

भक्तिआराधनेच्या या श्रावण मासात संकटमोचन श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद ठेवण्याची अतिप्राचीन परंपरा जोपासणारे हे राज्यातील वा संबंध देशभरात एकमेव हनुमान मंदिर असण्याचा कयास श्री हनुमान भक्तांमधून व्यक्त होत आहे. श्री हनुमान भक्तांमध्ये यासंबंधी एक कुतूहल व्यक्त होत आहे.

खानापूर येथील पुरातन श्रीराम मंदिराची मोठी आख्यायिका सांगितली जाते. एका मूर्तिकाराने बैलगाडीवर विक्रीसाठी आणलेल्या श्री प्रभुरामचंद्र, सीतामाई व लक्ष्मणाच्या अत्यंत मनमोहक मूर्तींची किंमत गावकऱ्यांच्या देणगीपेक्षा जास्त सांगितली. मूर्तिकाराने सांगितलेले मूल्य व लोकवर्गणी यात जमीन अस्मानाचा फरक राहिल्याने व्यवहार फिसकटला. म्हणून मूर्तिकाराने गावातून काढता पाय घेतला. तो मूर्तिकार पुढच्या कर्जोद गावी मुक्कामासाठी थांबला. तथापि या मुक्कामात त्याला प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला की, “मला खानापूरलाच थांबायचे आहे. त्या अनुषंगाने मूर्तिकाराने दुसऱ्या दिवशी पहाटे तडक खानापूर गाठले व खानापूरवासीयांनी दिलेली लोकवर्गणी स्वीकारून साक्षात दृष्टान्त घडवलेल्या श्री प्रभुरामचंद्रांच्या पावन मूर्तींचे पूजन करून त्या ग्रामस्थांच्या स्वाधीन केल्या. याच भव्य दिव्य अशा पश्चिममुखी असलेल्या श्रीराम मंदिराच्या पाठीशी सलग्न असे दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर साकारण्यात आले आहे. या पुरातन श्री हनुमान मंदिराच्या अंगणात असलेल्या भल्यामोठ्या दगडावर आषाढ वद्य अमावस्येनिमित्त बळी चढवून संपूर्ण श्रावणमासात ग्रामस्थ मांसाहार वर्ज्य करीत असत. किंबहुना, संपूर्ण श्रावणमासात श्री हनुमंतासमोर अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यासाठी श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद करून महिनाभरानंतर श्रावण वद्य अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या वा पोळ्याच्या सणानिमित्त ग्रामवासीयांसाठी खुली करण्यात येत असल्याची आख्यायिका आहे. त्या अनुषंगाने प्राचीन परंपरा जोपासण्यात येत असल्याची माहिती ग्रामपुरोहित नरेंद्र धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला दिली. संबंध राज्यात वा देशभरात ऐन धार्मिक व्रतवैकल्यांच्या श्रावणमासात श्री हनुमान मंदिराची कवाडे बंद ठेवण्याची पुरातन परंपरा जोपासणारे खानापूर हे गाव कदाचित पहिले व एकमाद्वितीय असावे, असा कयास व्यक्त केला जात आहे.

Web Title: The doors of Hanuman temple are kept closed during Shravanmas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.