अधिकाऱ्यांची बदली करता, तुमच्या बापाचा माल आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:16 IST2021-01-23T04:16:29+5:302021-01-23T04:16:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव औद्योगिक वसाहतीमधील १० एमव्हीएचे रोहित्र जळाल्यानंतर पाचोऱ्यातून ते नेण्याचा प्रयत्न वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी ...

Do you have your father's property when you replace the officers? | अधिकाऱ्यांची बदली करता, तुमच्या बापाचा माल आहे का?

अधिकाऱ्यांची बदली करता, तुमच्या बापाचा माल आहे का?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव औद्योगिक वसाहतीमधील १० एमव्हीएचे रोहित्र जळाल्यानंतर पाचोऱ्यातून ते नेण्याचा प्रयत्न वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, आपण ते रोहित्र नेऊ दिले नाही, म्हणून आता वरिष्ठ अधिकारी पाचोऱ्याच्या अधिकाऱ्यांना बदली करणार, कारवाई करणार अशा धमक्या देत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘हा तुमच्या बापाचा माल आहे का?’, असा संतप्त सवाल आ. किशोर पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीच्या भरसभेत विचारला. कामे मार्गी लागत नसल्याने नाराज असलेल्या आ. पाटील यांची जीभ घसरल्याचा प्रत्यय सभेदरम्यान आला. दरम्यान, कार्यकारी समितीचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी वीज वितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वीज वितरणच्या कामांचा आढावा घेताना आ. किशोर पाटील यांच्यासह सर्वांनी आगपाखड केली.

१२ कोटींत वीज वितरणचे कामे कसे होणार?

या बैठकीत कोणत्या विभागाने कोणता व किती आराखडा सादर केला याचा आढावा घेतला जात असताना वीज वितरणच्या १२ कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आल्यानंतर आ. किशोर पाटील यांनी वीज वितरणकडे रोहित्रांची समस्या असताना १२ कोटी रुपयांमध्ये कामे कसे होतील, असे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले. यासोबतच आ. चंद्रकांत पाटील यांनीही मुक्ताईनगरात वीजवाहिन्या लोंबकळलेल्या असल्याने अनेक अपघात झाले, त्याचेही कामे या निधीत कसे करणार, असा जाब विचारला. तर आ. अनिल पाटील यांनीही रोहित्रासाठी लागणाऱ्या ऑईलचा मुद्दा उपस्थित केला. एकूणच वीज वितरणच्या कामकाजाबाबत कार्यकारी समिती सदस्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त करीत कामात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. रावेर, यावल हा भाग केळीपट्टा असल्याने या भागातही नियमित वीज मिळण्याची मागणी आ. शिरीष चौधरी यांनी केली.

औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव रोहित्र का ठेवत नाही?

गेल्या महिन्यात जळगाव औद्योगिक वसाहत परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या वीज कंपनीचा १० एमव्हीएचे रोहित्र जळाल्याने जी सेक्टरमधील २५० उद्योगांची चाके थांबली होती. यावेळी पर्यायी रोहित्रही उपलब्ध नसल्याने पाचोरा येथून रोहित्र आणण्यासाठी वाहन गेले होते. मात्र, तेथे विरोध झाल्याने रोहित्र मिळू शकले नाही. अखेर चोपडा येथून रोहित्र आणले होते. रोहित्र नादुरुस्त होऊन लाखो रुपयांचे नुकसान होत असल्यास राखीव रोहित्र का ठेवत नाही, असा सवाल आ. किशोर पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

माहिती देण्यावरून स्थानिक अधिकाऱ्यांवर रोष

या प्रकरणात पाचोरा येथून रोहित्र आणू दिला नाही व याविषयी स्थानिक अधिकाऱ्यांना मला माहिती दिल्याचा रोष ठेवत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी पाचोरा येथील अधिकाऱ्यांना त्रास देत बदली करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला. त्यावरून त्यांनी पुढे अधिकाऱ्यांचा बाप काढत कारवाई करण्यासाठी ‘हा तुमच्या बापाचा माल आहे का?’ असा सवाल केला. आमदारांच्या या व्यक्तव्याबाबत उपस्थित अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले.

अधीक्षक अभियंत्यांची दांडी

वीज वितरणच्या कारभारावरून ही सभा गाजत असताना या बैठकीला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता फारुख शेख हे गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यांच्याऐवजी त्यांचे प्रतिनिधी म्हणून उपकार्यकारी अभियंता अजय वाणी हे उपस्थित होते.

Web Title: Do you have your father's property when you replace the officers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.