जळगाव - महापालिका निवडणुकीसाठी शहरात प्रचार शिगेला पोहचला असतानाच शुक्रवारी प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिंदेसेनेचे उमेदवार जिल्हा प्रमुख आणि माजी महापौर विष्णू भांगळे यांच्या प्रचार रॅलीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. ढोल ताशांच्या गजरात निघालेली प्रचार फेरी तुकारामवाडीत पोहोचताच येथील महिलांचा संताप अनावर झाला. तुकारामवाडीसाठी आधी काम करा अशा भाषेत महिलांनी भोंगळे यांना सुनावले.
विष्णू भोंगळे यांची प्रचार रॅली तुकारामवाडीत शिरताच महिलांनी रस्त्यावर येत ढोल ताशांचा गजर थांबवण्याची मागणी केली. ढोल ताशा काय वाजवता, आमच्या वस्तीतील प्रश्नांकडे लक्ष द्या असे म्हणत महिलांनी प्रचाराला विरोध केला. परिसरातील पाणीटंचाई, अस्वच्छता, सुविधांचा अभाव याबाबत महिलांनी तीव्र रोष व्यक्त केला. या महिलांनी उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे चित्र दिसून आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारांचा असंतोष थेट रस्त्यावर उतरल्याने उमेदवारांपुढील आव्हाने वाढली आहेत. ढोल ताशे व प्रचार फेऱ्यांपेक्षा प्रभागातील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
...अन् पाय काढता घेतला
निवडणुकीच्या वेळीच मतदार आठवतात, बाकी वेळेस कुणीही फिरकत नाही. तुकारामवाडीसाठी काहीच काम केले नाही. आता मत मागायला कशाला येता, असे म्हणत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. महिलांचा संतप्त पवित्रा पाहून विष्णू भांगळे यांना अखेर तेथून काढता पाय घ्यावा लागला.
दरम्यान, या संबंधित महिलांचा बोलविता धनी वेगळा आहे. मुळात या महिला या प्रभागात राहतात का हा प्रश्न आहे. त्यांनी माझ्याकडे कोणते काम आणले आणि मी केले नाही असे स्पष्ट करावे. प्रभागात देखील कोणतेच काम अपूर्ण नाही असा दावा शिंदेसेनेचे उमेदवार जिल्हाप्रमुख विष्णू भांगळे यांनी केला.