ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या; ओबीसी जनक्रांती व समता एकता परिषदेची मागणी
By विलास बारी | Updated: October 7, 2023 18:55 IST2023-10-07T18:55:46+5:302023-10-07T18:55:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणामध्ये आता अजून वाटेकरी नको. राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसी म्हणून ...

ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या; ओबीसी जनक्रांती व समता एकता परिषदेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणामध्ये आता अजून वाटेकरी नको. राज्य शासनाने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी ओबीसी जनक्रांती व समता एकता परिषदेकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पत्रकार परिषदेला ओबीसी नेते अनिल महाजन, अशोक लाडवंजारी, सरिता नेरकर, आप्पा महाजन, वसंत पाटील उपस्थित होते.
ओबीसी नेते अनिल महाजन यांनी माहिती देताना सांगितले की, जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावर होणारे भाषण हे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मागणारे आहे. यामुळे जाती-जातीमध्ये वाद निर्माण होण्याची मोठी शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी समाज शांत आहे. पण या गोरगरीब समाजाचा कुणीही अंत पाहू नये. ओबीसी समाज राज्यात ६० टक्के आहे. सर्वात जास्त मराठा समाजाचे लोक ओबीसी समाजाच्या मतावर आम्ही निवडून देत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात राज्य सरकारने ओबीसी समाजाची जनगणना करावी. माळी, कोळी, धनगर, वंजारी, तेली, साळी, धोबी, भाट अशा ३५० जाती ओबीसीमध्ये आहेत. पण राजकीयदृष्ट्या ओबीसी समाज जागृत नसल्याने राजकारणात यांचा टक्का एकदम कमी आहे.
ओबीसीमधून आरक्षणाची मागणी कुणी करीत असेल तर त्यास विरोध करीत आम्ही सर्व ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला.