जि. प. शिक्षण सभापतींच्या दालनात छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:05+5:302021-06-22T04:12:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत असलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या स्वीय सहायकांच्या ...

जि. प. शिक्षण सभापतींच्या दालनात छत कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत असलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांच्या स्वीय सहायकांच्या दालनाच्या छताचा काही भाग सोमवारी सकाळी ११ वाजता अचानक कोसळला. यात स्वीय सहायक कांतीलाल पाटील हे थोडक्यात बचावले. दरम्यान, या घटनेमुळे जुन्या इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जि. प. च्या जुन्या इमारतीत प्राथमिक व माध्यमिक कृषी विभाग, समाजकल्याण विभाग, अर्थ विभाग, शिक्षण व आरोग्य सभापतींचे दालन, सदस्य कक्ष, साने गुरुजी सभागृह असे विविध विभाग आहेत. यातील काही विभागांमध्ये नुकतेच नूतनीकरणाचे कामही झाले आहे. मात्र, या इमारतीचा काही भाग अत्यंत धोकादायक बनल्याचे सांगितले जात आहेत. याकडे तातडीने लक्ष देऊन सुधारणा केली न गेल्यास मोठा अपघात होण्याची भीतीही वर्तविण्यात येत आहे. अशाच प्रकारे सोमवारी सकाळी ११च्या सुमारास शिक्षण सभापतींचे स्वीय सहायक कांतीलाल पाटील हे बाजूला खुर्चीवर बसलेले असताना अचानक छताचा मोठा भाग खाली कोसळला ते बसतात अगदी त्याच जागेवर सिमेंटचा हा मोठा भाग कोसळला. यात ते योगायोगाने बचावले अन्यथा त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती, असे त्यांनी सांगितले.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
दालनात दुरुस्ती करण्याबाबतचे जि. प. बांधकाम विभागाला ऑक्टोबर महिन्यापासून पत्र देण्यात आलेले आहे. मात्र बांधकाम विभाग या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे, कांतीलाल पाटील यांनी म्हटले आहे. त्यावेळी ही दुरुस्ती झाली असती तर आजची घटना टाळता आली असती, असेही त्यांनी म्हटले आहे.