जि. प. च्या ९५ टक्के महिला कर्मचाऱ्यांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST2021-02-05T06:01:08+5:302021-02-05T06:01:08+5:30
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानपूर्वी तपासणी झाल्यानंतर ९५ टक्के महिला कर्मचाऱ्यांनामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता असल्याचे ...

जि. प. च्या ९५ टक्के महिला कर्मचाऱ्यांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदानपूर्वी तपासणी झाल्यानंतर ९५ टक्के महिला कर्मचाऱ्यांनामध्ये हिमोग्लोबीनची कमतरता असल्याचे समोर आले आहे. यामुळे या कर्मचारी महिलांना रक्तदान करता आले नाही. त्यामुळे पुरूष कर्मचाऱ्यांनीच या शिबिरात अधिकचा सहभाग नोंदविला. दिवसभरात १०२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीतर्फे रक्तसंकलन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सीईओ डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफीक तडवी, प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, डॉ. दिलीप पोटोडे, डॉ. प्रमोद पांढरे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे उत्कृष्ट पध्दतीने आयोजन केल्याबद्दल राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाला सन्मानपत्र देवून सन्मानित केले आहे. शिबिरासाठी डॉ. बाळासाहेब वाभळे आदींसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
का होते हिमोग्लोबीन कमी
आहार, लोहयुक्त अन्नाचे कमी सेवन करणे, प्रसूतीच्यावेळी अधिकचा रक्तस्त्राव होणे, पाळीदरम्यान अधिक रक्तस्त्राव होणे याबाबी महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी करतात.
हिमोग्लोबीनची कमी कशी भरून काढाल
लोहयुक्त अन्नाचे सेवन, गुळ, शेंगदाण्याचे लाडू, हिरव्या पालेभाज्या खाणे, रक्त अधिक जात असल्यास लोहाच्या गोळ्या घेणे, हिमोग्लोबीन तपासणी करूण घेणे.
हिमोग्लोबीन कमी असल्याने काय होते
कामाची क्षमता कमी होते, दम लागतो, थकवा जाणवतो, अधिक कमी असल्यास हृदयावर ताण पडतो ते जीवावर बेतू शकतो.
आहार या प्रमुख घटक आहे. योग्य लोहयुक्त आहार घेतला गेल्यास हिमोग्लोबीनची कमतरता येत नाही. यासाठी गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाणे फायदेशीर ठरते. हिमोग्लोबीन कमी असल्यास थकवा, दम, कामाची क्षमता कमी होणे या समस्या तर येताच मात्र, प्रमाण खूपच कमी असेल तर धोकादायक ठरू शकते. - डॉ. संजय बनसोडे, स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागप्रमुख