राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:55+5:302020-12-04T04:41:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला सोहळ्याचे स्वरूप ...

राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीला सोहळ्याचे स्वरूप येत या सभेत माजी आमदार डॉ. सतिश पाटील यांची अनुपस्थिती चर्चेचा मुद्दा ठरली. पक्षाच्या बॅनरवर फोटो नसल्याने ते नाराज असल्याचे सांगण्यात आले तर ज्यांनी फोटो टाकला नाही, त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी भर सभेत केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच पक्ष कार्यालयात सभेला हजेरी लावली. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे अध्यक्षस्थानी होते.
भाजपने आपल्याला पक्ष सोडायला भाग पाडले. हे सरकार स्थिर असून भाजप त्यांचे १०५ चे १्०४ होऊ नये म्हणून सरकार पडणार असल्याचे केवळ चॉकलेट देत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली. अटलजींच्या काळात ३२ पक्ष होते, आणि तीन पक्षांच्या सरकारला आता भाजप विराेध करीत असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा बँक संचालक संजय पवार यांनी राजकीय टोलेबाजी केली. डॉ. सतिष पाटील यांची नाराजी अजून गेली नसल्याचे सांगत कार्यकर्ता म्हणून मी जाहीर माफी मागतो, असे ते म्हणाले. दरम्यान, माजी आमदार मनिष जैन आणि एकनाथ खडसे यांनी शेजारी बसून बराच वेळ चर्चा केली. दरम्यान, आम्ही नवीन असून आम्हाला सांभाळून घ्या असे आवाहन रोहीणी खडसे यांनी केले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे यांनी ठेवीदारांसह भेट घेत एकनाथ खडसे यांचे आभार मानले. लवकरच ठेवीदारांचा मेळावा घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी जाहीर केले. यावेळी जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहीणी खडसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अरूण पाटील, माजी आमदार मनिष जैन, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रवक्ते योगेश देसले, विलास पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, डॉ. संजीव पाटील, उमेश नेमाडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्षात घेणे थांबवा
यावेळी तीन जणांचा पक्ष प्रवेश झाला, मात्र, ऐनवेळी उभे राहत योगेश देसले यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना आता पक्षात घेणे थांबवा, नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, असे सांगितले.