खरेदीची दिली सूट, प्रक्रियेदरम्यान केली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:51+5:302021-08-18T04:22:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटात आवश्यक साहित्य, यंत्रसामुग्री खरेदीसाठी वेळ लागू नये, यासाठी आपत्कालीन स्थिती म्हणून यंत्रणेला ...

Discounts purchased, loot made during the process | खरेदीची दिली सूट, प्रक्रियेदरम्यान केली लूट

खरेदीची दिली सूट, प्रक्रियेदरम्यान केली लूट

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संकटात आवश्यक साहित्य, यंत्रसामुग्री खरेदीसाठी वेळ लागू नये, यासाठी आपत्कालीन स्थिती म्हणून यंत्रणेला पालकमंत्री असो की इतर लोकप्रतिनिधींनी सूट दिली. मात्र खरेदी प्रक्रिया राबविताना याच आपत्कालीन स्थितीचा गैरफायदा घेत व्हेंटीलेटर असो की ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर असो यांची खरेदी करताना त्यात दर अधिक दाखवून अक्षरश: लूट झाल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे दर्जाविषयी तडजोड मान्य नसल्याचे खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे म्हणणे आहे. मात्र असे असले तरी खरेदी दरम्यान मागणीपेक्षा पुरवठा वेगळाच झाल्याचे मोहाडी रुग्णालयातील व्हेंटिलेटरवरून समोर आले आहे. या सर्व प्रकाराविषयी चौकशी होणार असून राज्यातील खरेदीसोबत याची तुलना केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील या कारभाराविषयी लोकमतने काही प्रश्न उपस्थित केले व ज्यांच्या निधीतून खरेदी झाली त्या खासदार रक्षा खडसे यांच्यासह पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली.

लोकमतने उपस्थित केलेले प्रश्न

१) बाजारमूल्यापेक्षा अधिक दराने साहित्य खरेदी करणे म्हणजे शासकीय निधीचा अपव्यय नाही का?

२) या सर्व प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांवर आरोप होत असताना समितीचा अहवाल त्यांच्याकडेच जाणे योग्य आहे का?

३) धरणगाव ग्रामीण रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट नसताना डिजिटल मेमोग्राफी मशीन खरेदी करणे योग्य आहे का?

खासदार रक्षा खडसे यांची भूमिका

- खासदार निधीतून खरेदीसाठी पत्र दिले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांनी जेएम पोर्टलवर प्रक्रिया राबवून खरेदी केली आहे. या विषयी माहिती घेतली जाईल.

- कोणत्याही खरेदीमध्ये दर्जाबाबत तडजोड होता कामा नये, याविषयीदेखील त्यांच्याकडे विचारणा होईल.

- निविदा प्रक्रिया अटीशर्तीनुसार राबविली पाहिजे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका

- या सर्व प्रकाराची चौकशी होईलच.

- आपत्ती व्यवस्थापन काळात प्रत्येक वेळी पालकमंत्र्यांकडे परवानगीसाठी यावे लागू नये यासाठी आपत्कालीन परिस्थिती म्हणून परवानगी न घेता खरेदीची सूट दिलेले असते. तरीही काही गैरप्रकार झाला असल्यास तपासून घेतो.

- धरणगाव येथे रेडिओलॉजिस्टची जागा लवकरच भरली जाईल. जिल्ह्यात डॉक्टरांची संख्या कमीच आहे. त्या रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न सुरूच आहे.

काय म्हणाले जिल्हाधिकारी

- या प्रकरणात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व तपासणी केली जाणार आहे.

- व्हेंटिलेटर प्रकरणाच्या चौकशीसाठी जी समिती आहे ती तांत्रिक समिती आहे. शेवटी तो अहवाल माझ्याकडे येणार आहे. दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. राज्यभरातील खरेदीशी तुलना करुन माहिती घेतली जाईल.

Web Title: Discounts purchased, loot made during the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.