वरणगाव : येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आस्वादसमोरील झुडपांमध्ये एक अनोळखी महिला विवस्त्रावस्थेत पहुडलेली होती. ती येथील समाजसेवक महेश सोनवणे यांच्या दृष्टीस पडली असता त्यांनी लागलीच येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा तावडे यांच्या मदतीने घरातील वस्त्रे नेसवून पोलीस स्टेशनला नेले.
सपोनि संदीपकुमार बोरसे यांना याबाबत कल्पना दिली. ही महिला संभ्रमावस्थेत असून ती काहीच बोलू शकली नाही. या महिलेस महिला पोलीस आरती भोई व महिला दक्षता समिती सदस्य सविता माळी, लक्ष्मी बैरागी यांच्या मदतीने ‘आशादीप’ला पोहोचवण्यात आले होते. परंतु ती महिला काहीच बोलत नसल्याने आशादीपमध्ये ठेवण्यात नकार दिला गेला. मात्र सविता माळी यांच्या प्रयत्नांमुळे तिला रात्रभर आशादीपगृहामध्ये ठेवून २४ ऑगस्ट रोजी तिची रवानगी नागपूर येथे करण्यात आली.