जळगाव जिल्ह्यातून गायब झालेली मुलगी सापडली चार तासात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:43 IST2018-02-27T22:43:35+5:302018-02-27T22:43:35+5:30
जामनेर येथून पहाटे चार वाजता घरातून गायब झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अवघ्या चार तासातच शोधून काढले. नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी पहाटे चार वाजता घरातून कोणालाच काहीही न सांगता निघून गेली. आई, वडील सकाळी सात वाजता झोपेतून उठले असता मुलगी जागेवर नसल्याचे पाहून त्यांचे भानच हरपले.

जळगाव जिल्ह्यातून गायब झालेली मुलगी सापडली चार तासात
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २७ : जामनेर येथून पहाटे चार वाजता घरातून गायब झालेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अवघ्या चार तासातच शोधून काढले. नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी पहाटे चार वाजता घरातून कोणालाच काहीही न सांगता निघून गेली. आई, वडील सकाळी सात वाजता झोपेतून उठले असता मुलगी जागेवर नसल्याचे पाहून त्यांचे भानच हरपले.
दरम्यान, सर्वत्र शोधाशोध करुनही कुठेच मिळून येत नसल्याने पालकांची चिंता अधिकच वाढली. सर्वत्र नातेवाईक व शेजारील नागरिक घरी जमल्याने पालकांना रडू कोसळले होते. मुलगी सापडत नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक जामनेर पोलीस ठाण्यात धडकले. लोकांचा दबाव व गर्दी पाहता पोलीस निरीक्षक नजीर शेख यांनी या प्रकरणात हरविल्याची नोंद घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या संपर्क साधून तांत्रिक माहितीच्या आधारावर काही माहिती मिळते का म्हणून प्रयत्न केला. कुराडे यांनी विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांना तातडीने मुलीच्या बाबतीत माहिती काढण्याच्या सूचना केल्या. जशी माहिती मिळत गेली तशी ती हेडकॉन्स्टेबल रमेश कुमावत यांच्यापर्यंत पोहचविण्यात येत होती.
दोन्ही यंत्रणांमध्ये योग्य समन्वय
दोन्ही यंत्रणामध्ये योग्य समन्वय झाल्याने चार तासातच मुलगी गावाशेजारी शेतात अभ्यास करताना आढळून आली. दरम्यान, अल्पवयीन मुले-मुली हरविल्या असतील तर थेट अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, मात्र या प्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा न दाखल करता हरविल्याची नोंद घेतली.