पोलीस महासंचालकांनीही तातडीने मागविली बीएचआरची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:44+5:302020-12-05T04:24:44+5:30
जळगाव : पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआरच्या कारवाईचे सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पोलीस महासंचालकांनीही तातडीने या संस्थेशी संबंधित सविस्तर ...

पोलीस महासंचालकांनीही तातडीने मागविली बीएचआरची माहिती
जळगाव : पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआरच्या कारवाईचे सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पोलीस महासंचालकांनीही तातडीने या संस्थेशी संबंधित सविस्तर व पुराव्यानिशी माहिती मागविली असून शुक्रवारी दिवसभर पोलीस अधीक्षक कार्यालयात याची धावपळ सुरु होती. दुसरीकडे पुण्यातील ठेवीदार आर्थिक गुन्हे शाखेकडे पोहचत असून त्यांच्याकडून लेखी तक्रारी नोंदविण्याचे काम सुरु झालेले आहे. जळगावात देखील ॲड.किर्ती पाटील यांच्याकडे देखील ठेवीदार धाव घेत आहेत.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर व इतर सहा जण अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
गेल्या शुक्रवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या १२ पथकांनी जळगावात एकाचवेळी धाडसत्र राबविले होते. सलग तीन दिवस तपासणी झाल्यानंतर संस्थेचा सनदी लेखाधिकारी धरम साखला, महावीर जैन, संस्थेचा कर्मचारी सुजीत बाविस्कर, विवेक ठाकरे व जितेंद्र कंडारे याचा चालक कमलाकर कोळी या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे. एकीकडे पुण्यात या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु असताना आता पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविण्यात आले असून या गुन्ह्याच्या संदर्भातील पुराव्यानिशी माहिती मागविली आहे. दरम्यान, बारामतीमधील हनुमंत तुकाराम कुदळे यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. कुदळे यांनी बारामती व जळगाव शाखेत १५ लाख ४८ हजाराच्या ठेवी ठेवलेल्या आहेत, मात्र अद्यापपर्यंत परत मिळालेल्या नाहीत.
या मुद्यांवर मागविली माहिती
या संस्थेत फसवणूक होऊन अपहार किती रकमेचा झालेला आहे,
एकूण किती गुन्हे दाखल आहेत,
यात किती आरोपी आहेत व त्यांची सद्यस्थिती काय?,
आतापर्यंत किती संपत्ती जप्त करण्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या आहेत.
किती संपत्ती अधिसूचीत करावयाची आहे व ही कारवाई पूर्ण झालेली आहे किंवा कसे,
किती आरोपींना अटक करणे बाकी आहे व किती आरोपींची जामीनावर मुक्तता झालेली आहे,
ही माहिती, कागदपत्रे व इतर पुरावे मागविण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांचे उपसहायक (गुन्हे) के.डी.लोहकर यांचे पत्र पोलीस अधीक्षकांना प्राप्त झाले आहे.
वार्षिक तपासणी अन् बीएचआरमुळे धावपळ
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडून पोलीस दलाची वार्षिक तपासणी ७ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात त्याची धावपळ सुरु असताना शुक्रवारी बीएचआरची माहिती पाठविण्याचे आदेश आल्याने ही माहिती संकलित करण्यासाठी धावपळ सुरु झाली. एकाचवेळी दोन्ही विषय आल्याने यंत्रणा व्यस्त होती.