निकालानंतर पाच दिवसात थेट मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:36+5:302021-09-04T04:20:36+5:30
जळगाव : जिल्हा दूध संघात नोकर भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल एक ते दोन दिवसात जाहीर होणार असून निकाल ...

निकालानंतर पाच दिवसात थेट मुलाखत
जळगाव : जिल्हा दूध संघात नोकर भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल एक ते दोन दिवसात जाहीर होणार असून निकाल लागल्याच्या पाच दिवसांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. एकूण १०४ जागांसाठी या मुलाखती होणार आहे.
जिल्हा दूध संघात अधिकारी वर्गासाठीच्या ३२, तर सहायक लिपिक वर्गाच्या १३२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केले व त्यानंतर परीक्षा झाली; मात्र या भरती प्रक्रियेवर दूध संघाच्या माजी कर्मचाऱ्यांनी हरकत घेतली. दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून, ते भरती करू शकत नाहीत, तसेच आरक्षण लागू असताना विनाआरक्षण भरती प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोप करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लागू शकला नव्हता. मात्र याचिकेवर सुनावणी झाली व खुल्या जागांवरील भरती करण्याची परवानगी देण्यात आली.
खुल्या जागेवरील भरतीस परवानगी मिळाल्याने १६४ पैकी १०४ जागा भरल्या जाणार आहेत. परवानगीनंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल एक ते दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्याच्या पाच दिवसांनंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिली.
दरम्यान, भरती प्रक्रियेविषयी झालेल्या सुनावणीवेळी खुल्या जागांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे.