संगणकीकरणाला दिंरगाईचा व्हायरस

By Admin | Updated: August 27, 2014 15:13 IST2014-08-27T15:13:11+5:302014-08-27T15:13:11+5:30

महापालिकेच्या वसुली विभागाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यास एक वर्षापूर्वीच सुरुवात झाली होती.

Dinghyai Virus of Computerization | संगणकीकरणाला दिंरगाईचा व्हायरस

संगणकीकरणाला दिंरगाईचा व्हायरस

धुळे : महापालिकेच्या वसुली विभागाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यास एक वर्षापूर्वीच सुरुवात झाली होती. परंतु हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वसुलीसह नागरिकांना अचूक बिले देण्यासह त्यांच्या नोंदी करण्यास अडचणी निर्माण झाल्याआहेत. 

महापालिकेचा आर्थिक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून वसुली विभागाकडे पाहिले जाते. या विभागाकडून मालमत्ता, पाणीपट्टी, स्वच्छता, विशेष शिक्षण, महाराष्ट्र शिक्षण, पशुसंवर्धन, जललाभ, पथकर, दिवाबत्ती, मलनिस्सारण, मलप्रवाह, रोजगार हमी, मोठी निवासी जागा आदी विविध प्रकारच्या १३ करांची वसुली केली जाते. त्यात चालू वर्षाची मालमत्ता करांची मागणी ही १६ कोटी २९ लाखांची आहे, तर थकबाकी ही २६ कोटी आहे. अशी एकूण ४३ कोटींची मागणी आहे. चालू मागणी व थकबाकी यांची कीर्द लिहिण्यासच कर्मचार्‍यांचा बराच वेळ जातो. तसेच बिले तयार करणे, त्यांचे वाटप करण्याच्या कामांमुळे प्रत्यक्ष वसुलीला दिरंगाई होते. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त वसुली करताना कर्मचार्‍यांपुढे मोठी अडचण निर्माण होते. या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा उपयोग येथील मनपाच्या वसुली विभागात करण्यास सुरुवात झाली होती. या प्रणालीत करदात्यांना जागेवरच बिले दिली जाणार आहेत. त्यांनी लगेच पैसे दिल्यास पावतीही लगेच दिली जाणार होती. २0१३ पासून संगणकीकृत बिले देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र २0१४ पर्यंतही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी भरलेली बिले त्यांना पुन्हा देणे, तक्रार केल्यावर मागील बिल आणण्यास सांगणे आदी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संगणकीकरण झाल्यास त्वरित त्याची पडताळणी करणे शक्य होणार आहे. यामुळे कर्मचारी व नागरिकांचा वेळ आणि मानसिक त्रासही वाचणार आहे. या कामासाठी जागेची अडचण असल्याची बाब समोर आली आहे.
--------------
जागेच्या अडचणीमुळे संगणकीकरणाचे काम रखडले. हे काम त्वरित सुरू करण्यासाठी जागेची अडचण सोडविण्यात आलीआहे. त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण केले जाणार आहे. एकाच वेळी १0 संगणकांवर डाटा फिड केला जाणार आहे. २0१५ पासून संगणकीय बिले नागरिकांना दिली जातील. -त्र्यंबक कांबळेसहा. आयुक्त (कर विभाग), महापालिका, धुळे 

Web Title: Dinghyai Virus of Computerization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.