दिगंबर जैन तीर्थक्षेत्रावर होणार दीक्षा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 16:52 IST2017-08-13T16:49:40+5:302017-08-13T16:52:53+5:30
फर्दापुरात होणार 20 ऑगस्ट रोजी सोहळा

दिगंबर जैन तीर्थक्षेत्रावर होणार दीक्षा महोत्सव
ऑनलाईन लोकमत वाकोद (जि. जळगाव), दि. 13 : येथून जवळच असलेल्या श्री. दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्र फर्दापूर (ता. जामनेर) येथे 20 ऑगस्ट रोजी परमपूज्य बालाचार्य 108 कल्पवृक्षनंदिजी महाराज यांचा 26वा दीक्षा जयंती महोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार प्रमुख अतिथी असतील. श्रीकल्पवृक्षनंदिजी महाराज हे मूळचे पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा, जि.जळगाव) येथील आहेत. त्यांनी जैनाचार्य दीक्षा घेतल्यानंतर आसाम, मिझोराम, नागालँड, बिहार, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चित बंगाल आदी राज्यांमध्ये जैन धर्मतत्व प्रचार व प्रसाराचे कार्य केले आहे. नुकतेच त्यांचे फर्दापूरतांडा (ता.सोयगाव) येथील दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्रावर आगमन झाले असून, या तीर्थक्षेत्रावर त्यांचे चातुर्मास पर्व सुरू आहे. दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता दिगंबर जैन कल्पवृक्ष कलशाकार तीर्थक्षेत्रावर दिगंबर जैन स्थायी समिती व जैन समाज बांधवांच्या वतीने 26वा दीक्षा जयंती महोत्सव होईल. या वेळी संघत्यागी परमपूज्य मुनीश्री 108 विशेषसागरजी महाराज, प.पू. आर्यिका 105 उद्धारमती माताजी, क्षुल्लीका 105 कुंदनश्री माताजी, तीर्थनिर्देशिका विमला दिदी, तीर्थसंचालिका सपना दिदी, ब्र. कुसुम दीदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास दिगंबर जैन अनुयायांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे व जैन धर्म दीक्षेचा व प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिगंबर जैन स्थायी समितीचे विश्वस्त धन्यकुमार जैन (जळगाव), मनोज छाबडा (तोंडापूर), गणेश देरेकर (जळगाव), सतीश साखरे, रमेश अन्नदाते, प्रकाश मुळकुटकर (भुसावळ), जितेंद्र जैन (पिंपळगाव हरेश्वर), राकेश सैतवाल (फर्दापूर) यांनी केले आहे.