पंधरा दिवसांआधीच झाला कासवांचा मृत्यू ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:17 IST2021-05-25T04:17:44+5:302021-05-25T04:17:44+5:30
वन्यजीवप्रेमींचा अंदाज : पाइपलाइनच्या खोदकामामुळे बाधित झाला अधिवास लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील असोदा येथे बळीराजा योजनेंतर्गत ...

पंधरा दिवसांआधीच झाला कासवांचा मृत्यू ?
वन्यजीवप्रेमींचा अंदाज : पाइपलाइनच्या खोदकामामुळे बाधित झाला अधिवास
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील असोदा येथे बळीराजा योजनेंतर्गत खोदण्यात आलेल्या लोखंडी पाइपलाइनमधील उष्णतेमुळे कासवांचा मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या परिसरात पाहणी केली असता, या ठिकाणी मृत झालेल्या कासवांचा मृत्यू हा १-२ दिवसांपासून नाही, तर पंधरा दिवसांआधीच मृत्यू झाल्याचा अंदाज या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रविवारी मानद वन्यजीवरक्षक रवींद्र फालक यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, प्रसाद सोनवणे व कैलास साळुंखे यांच्या पथकाने सोमवारी असोदा परिसरातील लवकी नाल्याच्या ठिकाणी मृतावस्थेत आढळलेल्या खोदकामाच्या ठिकाणी पाहणी केली. पथकातील सदस्यांनी पाटचारी भागात २ किमीच्या परिसराची पाहणी केली. त्यावरून कासवांचा अधिवास बाधित झाल्याने काही कासव मुख्य अधिवासात कायम राहिले, तर काही कासव स्थलांतरादरम्यान या पाइपमध्ये अडकले, तर काही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाल्याची शंका वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खोदकामामुळे कासवांचा अधिवास झाला बाधित
पथकातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार नाल्याच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून कासवांचा अधिवास तयार झालेला आढळून येतो. मात्र, खोदकामामुळे हा आदिवासी बाधित झाल्याने काही कासव मुख्य अधिवासाच्या विपरित दिशेने अडकले. मुख्य अधिवासात परत येताना काही कासव मातीच्या ढिगाऱ्याखाली घसरून तर काही कासव खड्ड्यात पडले. त्यामुळे भुकेने व उष्णतेने या कासवांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अनेक कासव मुख्य अधिवासात सुरक्षित
वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी खोदकाम करण्यात आलेल्या नाल्याच्या परिसरात पाहणी केली असताना मुख्य अधिवासात अनेक कासव जिवंत व सुरक्षित आढळून आल्याची माहिती वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांनी लोकमतला दिली. दरम्यान, मृत्यू झालेल्या कासवांच्या अवशेषांची पाहणी केली असता या कासवांचा पंधरा दिवस आधीच मृत्यू झाल्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रदूषित पाण्यामुळे जैवविविधता धोक्यात
असोदा परिसरातील लवकी या नाल्याचा उल्लेख कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतदेखील आढळून आला आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या या जुन्या नाल्यात एकेकाळी मासेदेखील आढळून येत होते. मात्र, जळगाव शहराचा बांधलेला विस्तार व एमआयडीसी परिसरातून या नाल्यालगत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे या नाल्यातील जैवविविधता धोक्यात आली आहे. अनेक वर्षांपूर्वीच नाल्यांमध्ये मासे नामशेष झाले आहेत, तर आता कासवांचा अधिवासदेखील धोक्यात आला आहे.
कोट
पुलाखालून आलेला नाला व नाल्यातील दलदलीचा भाग हा कासवांचा अधिवास होता. संबंधित ठेकेदाराने पाइपलाइन टाकताना याबाबत पडताळणी करणे आवश्यक होते. या भागात पाइप टाकत असताना आणि कासव या पाइपखाली दाबले गेल्याची शक्यता आहे.
-रवींद्र पालक, मानद वन्यजीवरक्षक
कासव उष्णतेमुळे किंवा पाण्यात प्रदूषित घटक वाढल्याने मेले, हे जरी खरे असले तरी त्यांना उष्णतेत येण्यासाठी भाग पाडले गेले. कोणतीही विकासकामे करताना जैवविविधतेतील लहानात लहान घटकांचा विचार करून मग कामे केली पाहिजे. मोठमोठी यंत्रे वापरून कामे केली जातात. यंत्रावर बसणाऱ्याला खाली काय जीव जाणार आहे, हे दिसतच नाही.
- बाळकृष्ण देवरे, वन्यजीव अभ्यासक