दीर-भावजयीचा निर्घृण खून
By Admin | Updated: October 13, 2015 23:05 IST2015-10-13T23:05:37+5:302015-10-13T23:05:37+5:30
स्नेहनगरात दीर-भावजयीचा अत्यंत निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

दीर-भावजयीचा निर्घृण खून
धुळे : शहरातील स्नेहनगरात तरुण दीर-भावजयीचा अत्यंत निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या थरारक घटनेत शस्त्रांनी वार झालेल्या दिराचा मृतदेह साडीने गळफास घेऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला, तर कोयत्याने वार झालेला भावजयीचा मृतदेह झाडाझुडपांमध्ये आढळून आला. या घटनेतील दिराचे नाव सुरेश उर्फ पप्पू डिगंबर मोरे (वय 24, रा.श्रीरामनगर, दूध डेअरीमागे, धुळे) असे तर भावजयीचे नाव कविता संतोष मोरे (28, रा.अरुणकुमार वैद्यनगर, साक्री रोड, धुळे) असे आहे. याप्रकरणी मयत कविताचे पती संतोष डिगंबर मोरे यांच्या फिर्यादीवरून रात्री शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेशचा मृतदेह दिसला अन्.. स्नेहनगरातील खांडलविप्र भवनाच्या मागे सोमवारी मध्यरात्री झाडाला एका तरुणाचा मृतदेह साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. शहर पोलिसांनी पंचनाम्यानंतर सुरेशचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याच्या गळ्यावर, हातांवर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आजूबाजूला पाहणी केली असता झाडाझुडपांमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. 4हा मृतदेह मयत सुरेशची भावजयी कविता हिचा होता. मृतदेहाच्या बाजूलाच धारदार कोयता व दगड मिळून आला. कविताच्या डाव्या कानाच्या बाजूस कोयत्याने वार करण्यात आले आहेत.