धरणगाव ‘हगणदरीमुक्त’ जाहीर
By Admin | Updated: May 8, 2017 00:43 IST2017-05-08T00:43:44+5:302017-05-08T00:43:44+5:30
पालिकेला दिल्या काही सूचना : केंद्रस्तरीय पथक येणार पाहणीसाठी

धरणगाव ‘हगणदरीमुक्त’ जाहीर
धरणगाव : येथील पालिकेने राबविलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत तपासणीसाठी राज्यस्तरीय समितीने दोन दिवस तपासणी करून शहराला ‘हगणदरीमुक्त’ गाव म्हणून जाहीर केले. त्याचबरोबर स्वच्छतेसंदर्भात पालिकेला काही सूचना दिल्या आहेत.
पाहणीसाठी आलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या राज्यस्तरीय समितीत नाशिक महापालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्यासह समितीने दोन दिवस पाहणी करून शहराची सर्व सार्वजनिक शौचालये, शालेय शौचालये, उघडय़ावर पूर्वी बसत असलेली स्थळे आदी ठिकाणी भेटी देऊन खात्री केली. मुख्याधिकारी सपना वसावा, आरोग्य निरीक्षक आर.आर. गांगुर्डे, मुख्य लिपिक आर.व्ही.बारड, लेखापाल डी.एस.चौधरी, लिपिक जयेश भावसार यांनी शहरातील विविध स्थळे दाखवून पथकाला माहिती दिली.
पथकाने पाहणीचा अहवाल दिला व शहर ‘हगणदरीमुक्त’ झाल्याचे जाहीर केले. पालिकेच्या सर्व कर्मचा:यांनी परिश्रम घेतल्याने शहर हगणदरीमुक्त झाले आहे. समितीने मात्र सार्वजनिक शौचालयांसंदर्भात व कचरा व्यवस्थापन करण्यासंदर्भात काही निर्देशही दिले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून धरणगाव नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचा:यांनी अथक परिश्रमाने नागरिकांचा रोष पत्करून हगणदरीमुक्त अभियान राबविले. आजच्या स्थितीत त्याला यश आल्याचा आनंद आहे. केंद्रीय समिती येण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.
-सपना वसावा,
मुख्याधिकारी,
नगरपालिका, धरणगाव.