जिल्ह्यातील ११ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:20 IST2021-02-27T04:20:53+5:302021-02-27T04:20:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बालकांमधील रक्तक्षय तसेच कृमी दोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाभरात १ मार्च ते ८ मार्च ...

जिल्ह्यातील ११ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बालकांमधील रक्तक्षय तसेच कृमी दोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाभरात १ मार्च ते ८ मार्च पर्यंत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहिम राबविण्या येणार आहे. ११ लाख १७ हजार ८५० बालकांना या गोळ्या देण्यात येणार आहे.
आरोग्य विभागातर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोविड असल्याने शाळा व अंगणवाडी बंद असल्याने १ ते १९ वर्षापर्यंतच्या मुला मुलींना घरोघरी या गोळ्यांचे वाटप केले जाणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना या गोळ्या देऊन त्यांचा आजारापासून बचाव करावा, असे आवाहन डॉ. जमादार यांनी केले आहे. माती परिक्षणानंतर टक्केवारीनुसार कुठे किती गोळ्या द्यायच्या याचे प्रमाण ठरवले जाते, असे डॉ. जमादार यांनी सांगितले.
जंतनाशक गोळ्या का आवश्यक
मातीतून प्रसारीत होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण २९ टक्के आहे.
५ वर्षाखालील मुला, मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आहे. पाच वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी ३४. ४ टक्के आहे. १५ ते १९ वर्षाच्या ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये ३० टक्क मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो.
आशांची आधी कोविड टेस्ट
२९२८ आशांमार्फत घरोघरी बालकांना या गोळ्या वाटप करण्यात येणार असून त्यांच्या समोरच बालकांनी या गोळ्या घ्यायच्या आहेत. मात्र, या मोहिमेआधी या सर्व कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी दिली.