विवरे बुद्रूक ग्रामपंचायतीने केली वीज कंपनीवर दोन कोटी कराची आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:44+5:302021-09-02T04:37:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विवरे बुद्रूक, ता. रावेर : गेल्या आठवड्यात वीज वितरण कंपनीने धडक कारवाई करीत गावातील ...

विवरे बुद्रूक ग्रामपंचायतीने केली वीज कंपनीवर दोन कोटी कराची आकारणी
लोकमत न्यूज नेटवर्क
विवरे बुद्रूक, ता. रावेर : गेल्या आठवड्यात वीज वितरण कंपनीने धडक कारवाई करीत गावातील पाणीपुरवठा वीज पंप व पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पथ दिवे बंद असल्याने गाव अंधारात आहे. वीज वितरण कंपनीने अधिकाराचा वापर करून वीज खंडित केली. आता आम्ही ग्रामपंचायतीचा कर आकारणी व वसुलीच्या अधिकाराचा वापर करीत आमच्या हद्दीतील वीज कंपनीचे वीज खांब, रोहित्र, टॉवर, उच्च दाब वाहिन्यांवर कर आकारणी करण्याचा प्रस्ताव माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी ग्रामसभेत मांडला. यानुसार वीज कंपनीकडून दोन कोटीचा कर वसूल करण्याचा निर्णय झाला.
विवरे बुद्रूक ग्रामपंचायती ग्रामसभा दोन वर्षानंतर सरपंच युनूस तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत जैविक विविधता समिती, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, दक्षता समिती यांचे गठण करण्यात येऊन तंटामुक्ती समिती अध्यक्षपदासाठी तीन नावे असल्याने गोंधळ उडाला. विविध समस्या व विषयांवर चर्चा होऊन सभा झाली.
यांची होती उपस्थिती
सभेला उपसरपंच भाग्यश्री पाटील, माजी सरपंच वासुदेव नरवाडे, रेखा गाढे, ललिता पाचपांडे, युसुफ खाटीक, नौशाद बी इस्माईल, विनोद मोरे, विपीन राणे, पूनम बोंडे, शिवाजी पाटील, नीलिमा सणंसे, दीपक राणे, ग्रामविकास अधिकारी अरविंद कोलते, भागवत महाजन, भूषण बोंडे, इस्माईलखान, अरुण पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी शेळके, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जसा वीज वितरण कंपनीला वसुलीचा अधिकार आहे. तसा ग्रामपंचायत स्वायत्ता संस्था असल्याने आपल्या हद्दीतील व्यावसायिकांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १२४कर फी नियम ६६ भाग ७ ( ब ) अन्वये वीज वितरण कंपनीवर कर लावण्याचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून हद्दीतील वीज कंपनीच्या मालमत्तेवर रेडीरेकनर दर प्रणालीनुसार कर व सेवा कर लावण्याचा प्रस्ताव ग्रामसभेसमोर ठेवून मंजूर केला. कर भरण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीही अधिकाराचा वापर करून वीज कंपनीच्या मालमत्तेवर कर आकारणी करून ग्रामपंचायतीला मजबूत करावे.
-वासुदेव नरवाडे, सदस्य, ग्रामपंचायत, विवरे बुद्रूक, ता. रावेर