दोन वेळा ऑडिट होऊनही रक्कम मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:19+5:302021-07-10T04:13:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अतिरिक्त बिलाच्या तक्रारीनंतर ऑडिट होऊन अतिरक्त रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन वेळा ...

दोन वेळा ऑडिट होऊनही रक्कम मिळेना
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अतिरिक्त बिलाच्या तक्रारीनंतर ऑडिट होऊन अतिरक्त रक्कम परत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन वेळा देऊनही रुबी हॉस्पिटलकडून रक्कम परत मिळत नसल्याने रुग्णांच्या मुलाने शुक्रवारी अखेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, या बिलांचे पुन्हा ऑडिट करण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिल्याची माहिती, संबंधित तक्रारदाराने दिली.
भुसावळ येथील भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ. नि. तू. पाटील यांनी तक्रारदार भाग्येश चौधरी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भुसावळ येथील दिलीप चौधरी व त्यांच्या पत्नी शोभा
चौधरी यांना रुबी हॉस्पिटलमध्ये ३१ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान दाखल करण्यात आले होते. यात दिलीप चौधरी यांचे २ लाख २६ हजार २००, तर शोभा चौधरी यांचे ९३५०० बिल काढले होते. याबाबत तक्रार केल्यानंतर १६ डिसेंबरला यातील दिलीप चौधरी यांचे ९७ हजार
२००, तर शोभा चौधरी यांच्या बिलातून ६५ हजार ५०० रुपये परत करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले होते. मात्र, सहा महिने होऊनही त्यांना पैसे मिळाले नाही, नंतर पुन्हा ऑडिट होऊन यात ४७ हजार रुपये परत करण्याचे आदेश देण्यात आले.
मग आधी झालेल्या ऑडिटवर अधिकाऱ्यांचा विश्वास नाही का, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे. त्यामुळे कुटुंबीयांची फिरवाफिरव न करता त्यांना पैसे परत मिळावे, अशी मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे. यावर जिल्हा रुग्णालयात सकाळी ऑडिटर व
तक्रारदार यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.
कोट -
संबंधित महिला रुग्णाला आम्ही २० टक्क्यांमध्ये दाखल केले होते. अतिरिक्त बिलाची रक्कम आम्ही धनादेशद्वारे शुक्रवारीच जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे जमा केली आहे. - डॉ. पल्लवी राणे, रुबी हॉस्पिटल